नाशिक । प्रतिनिधी Nashik
शिवसेनेचा 57 वा वर्धापनदिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने शिवसेना नाशिक शहर जिल्ह्याच्या वतीने दि. 19 जून ते 19 जुलै हा संपूर्ण महिना भगवा महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण नाशिक शहर शहरातील मुख्य चौक भगवेमय करण्यात आले असून सर्व शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शिवसेनेचे शिलेदार सोमवारी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून गोरेगाव, मुबई येथे कार्यक्रमासाठी रवाना होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते व महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी दिली.
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त दि.19 जून रोजी वाढदिवस असलेल्या शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा नाशिकच्या शिवसेना मुख्यालयात (मायको सर्कल) सत्कार करण्यात येणार आहे. सोबतच या सर्व ज्येष्ठांची संपूर्ण वर्षभर मोफत आरोग्य चिकित्सा पुरवण्याची जबाबदारी नाशिक शिवसेनेच्या वतीने घेण्यात येणार आहे.
शिवसेना क्रीडा सेलच्या माध्यमातून नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, या जिल्ह्यातील 52 तालुक्यांमधून 102 क्रीडा शिक्षकांचा रविवारी(दि.25) शुभमंगल कार्यालय, बळी मंदिर येथे क्रीडारत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. शासन आपल्या दारी या योजने अंतर्गत ‘योजनांची जत्रा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसाठी राबवलेल्या योजनांची माहिती समाजाचा शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून, लाभार्थींना याचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
महिलांचा प्रवेश
शिवसेना मध्यवर्ती कार्यालय आयोजित कार्यक्रमात धडाडीच्या महिला कार्यकर्त्या नेत्रा कदम, शुभांगी ठाकूर, अनुपमा जोशी, स्नेहल आंबेरकर, स्नेहा मोडक, तन्वी उपासनी, गायत्री भंडारी, रुपाली पवार, लता नाशिककर या नाशिक शहरातील विविध भागातील महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला. जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते व महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांच्या हस्ते त्यांचे शिवधनुष्य हाती देत स्वागत करण्यात आले. यावेळी मंगला भास्कर, युवासेना विस्तारक योगेश बेलदार, उप जिल्हाप्रमुख अमोल सूर्यवंशी, विधानसभा प्रमुख रोशन शिंदे आदी उपस्थित होते.