Saturday, July 27, 2024
Homeजळगावशिवसेना भाजप सत्ता परिवर्तन झाल्यास जिल्ह्यात सेनेचा भाजपाविरोध मावळणार?

शिवसेना भाजप सत्ता परिवर्तन झाल्यास जिल्ह्यात सेनेचा भाजपाविरोध मावळणार?

जळगाव । प्रतिनिधी jalgaon

राज्यात ठाकरे सरकार (Thackeray government) धोक्यात आले आहे. (Eknathrao Shinde) एकनाथराव शिंदे यांच्या मागण्या मान्य न झाल्यास सत्तापरीवर्तन अटळ आहे. हे सत्ता परिवर्तन झाल्यास जिल्ह्यातील शिवसेनेचा (Shiv Sena) गेल्या अडीच वर्षांपासून केलेला भाजपा विरोध मावळणार काय? असा प्रश्न उपस्थित होत असून आगामी निवडणुकांच्यादृष्टीने शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात सापडले आहे.

- Advertisement -

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 35 हून अधिक आमदारांनी बंड पुकारल्याने राज्यातील ठाकरे सरकारवर मोठे संकट उभे राहिले आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणा मोठ्या घडामोडी घडत आहे. महाविकास आघाडीशी संबंध तोडून पुन्हा भाजपासोबत जाण्याची मागणीवजा निरोप शिंदेंसह त्यांच्या समर्थकांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंना पाठविला आहे.

अद्याप यावर पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कुठलाही निर्णय न दिल्याने राज्यात सत्तापरिवर्तनाच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. भाजपाकडूनही सत्तास्थापनेबाबत गणिते आखली जात आहे.

जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघणार

राज्यात गेल्या अडीच वर्षापासून महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचा राजकीय शत्रु भाजप आहे. गत अडीच वर्षात शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह आ. किशोर पाटील, आ. चिमणराव पाटील यांनी राजकीय विरोधक म्हणून भाजपाविरोधात टिकात्मक विधाने केली.

तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून भाजपा कार्यालयावर हल्ले देखिल करण्यात आल्याने दोन्ही पक्षांमध्ये टोकाचा संघर्ष अडीच वर्षात जिल्हावासियांनी बघीतला आहे. आणि आता राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यास शिवसेनेचा हाच टोकाचा भाजपा विरोध मावळेल काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.

नेतृत्वस्तरावर खडसेंशी होणार सामना : जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडी असली तरी भाजपा नेते आमदार गिरीश महाजन आणि शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या दोस्ती सर्वांना ज्ञात आहे. एकनाथराव खडसे आता राष्ट्रवादीत असून ते नुकतेच विधान परिषदेवर निवडून आले आहेत. त्यामुळे राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यास नेतृत्वस्तरावर आमदार गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा राष्ट्रवादीचे आ. एकनाथराव खडसे यांच्याशी सामना रंगणार आहे. कारण सत्तापरिवर्तनानंतर जिल्ह्यात राष्ट्रवादी हा भाजपा आणि शिंदेसेनेचा प्रमुख विरोधी पक्ष राहणार आहे.

जि.प., पालिका निवडणुकांचेही समीकरण बदलणार

जिल्ह्यात आगामी काही महिन्यात जिल्हा परिषद आणि पालिका निवडणूका होऊ घातल्या आहेत. जिल्हा परिषदेत सद्यस्थितीला शिवसेना आणि राष्ट्रवादी हे विरोधात असून काँग्रेसच्या एका सदस्याच्या बळावर भाजपा सत्तेत आहे. सत्ता परिवर्तन झाल्यास शिवसेना सत्तेत की विरोधात राहील हे येणारा काळच ठरवेल. मात्र जिल्हा परिषदेपाठोपाठ पालिकांमधील सत्तासमीकरणेही बदलण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या