Saturday, July 27, 2024
Homeशब्दगंधशिवभक्त अक्का महादेवी

शिवभक्त अक्का महादेवी

– सुरेखा बोऱ्हाडे

भारताच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या. त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली. या सदरातून ओळख करून घेऊया भारतवर्षातील अशाच काही देदीप्यमान शलाकांची.

- Advertisement -

अक्का महादेवी या एक परम शिवभक्त असलेल्या कन्नड संत साहित्यातील महान कवयित्री होत्या. बाराव्या शतकात दक्षिण भारतात कर्नाटक राज्यात जन्मलेल्या महादेवी यांचे काव्य-वचनाचे कन्नड साहित्यात मोठे योगदान मानले जाते. त्यांनी एकूण 430 पदांची रचना केली. वयाने सर्वात लहान असणार्‍या या महादेवीस शरण समुदायात अक्का संबोधून इतके महत थोरलेपण दिले गेले.

आद्य शरणांच्या साठ वचनांना बसवण्णांची वीस वचने,

बसवण्णांच्या वीस वचनांना प्रभुदेवांची दहा वचने,

प्रभुदेवांच्या दहा वचनांना अजगण्णांची पाच वचने,

अजगण्णांच्या पाच वचनांना कुडलचेन्नसंगय्यातील

अक्कमहादेवीचे एकच वचन सम होई पहा.

श्रेष्ठ संत चेन्नबसवण्णा अक्का महादेवीच्या वचन रचनेची महती गाताना वरील उद्गार काढतात.

बाल्यकाळापासून महादेवावर भक्ती करत त्यांनी शिवभक्तीवर अनेक पदांची रचना केली. वीरशैव पंथातील अनेक संतांनी त्यांना भक्तीत उच्च दर्जा दिला. त्यामध्ये बसव चेन्नबसव, किन्नरी बोम्मेया, सिद्धर्मा, अलामप्रभू आणि दास्सिमैया हे प्रमुख होते. लौकिक जगतात एका राजाबरोबर विवाह करायला लागला तरी आपल्या शिवभक्तीसाठी भर राज्यसभेत अंगावरील वस्त्र भूषणांचा व राजमहालाचा त्याग करून आपल्या शिवभक्तीचा निर्धार कायम ठेवून रानोमाळी फिरणार्‍या अक्का महादेवींचे एक स्त्री म्हणून त्याकाळातील धारिष्ट्य अवर्णनीय म्हणावे लागेल.

अक्का महादेवींचा जन्म कर्नाटकात शिवमोगा जिल्ह्यात शिकारीपूर या गावात सन 1130 मध्ये झाला. त्यांचे वडील निर्मल शेट्टी आणि आई सुमती हे दोघेही मोठे शिवभक्त होते. वयाच्या दहाव्या वर्षी महादेवींनी शिव मंत्राची दीक्षा घेतली होती. भक्तीमधील चार भावप्रकार दास्य, सखा, वात्सल्य आणि माधुर्य. यामध्ये शिवाप्रती त्यांची भक्ती माधुर्य भक्ती होती. लहानपणापासून शिवभक्तीवर त्या काव्यपद रचून त्या गात असत. अक्का महादेवींनी आपल्या प्रभू शिव शंकराचे अगदी सजीव चित्रण आपल्या काव्यातून केले आहे. त्या म्हणत, माझा देह फक्त नावाला एक स्त्री देह आहे; परंतु माझा देह, मन, आत्म सर्व काही शिवाचे आहे. शिवभक्ती करत जेव्हा महादेवींनी तारुण्यात प्रवेश केला तेव्हा त्यांचे अनुपमेय सौंदर्य कोणालाही मोहित करणारे होते.अशातच नदीकिनार्‍यावर महादेवी जेव्हा शिवाची पूजा करत होत्या तेव्हा येथील राजा कौशिक याची नजर महादेवींवर पडली. महादेवींच्या अप्रतिम सौंदर्याची मोहिनी राजावर पडली आणि त्याने त्यांच्याशी विवाह करण्याची इच्छा प्रदर्शित केली. महादेवींनी लग्नाला नकार दिला. माझा पती फक्त शिव आहे, असे त्यांनी सांगितले. परंतु राजाने महादेवींच्या कुटुंबियांवर दबाव आणून महादेवींशी विवाह केला.

अक्का महादेवींनी राजाबरोबर विवाह केला; परंतु त्या दूरच राहिल्या. राजा कौशिकला वाटत होते, लग्नानंतर महादेवी आपला हट्ट सोडतील. म्हणून विविध प्रकारे आपले महादेवींवरचे प्रेम तो व्यक्त करू पाहत होता. परंतु महादेवी आपल्या निर्धारावर ठाम होत्या. त्या म्हणत, माझा विवाह शिवाबरोबर झाला आहे. मी दुसर्‍या कुणाची होणे शक्य नाही. राजा महादेवींच्या या वागण्याने त्रस्त झाला व चिडला. अशी पत्नी सांभाळून काय उपयोग आहे. म्हणून या विषयाचा न्यायनिवाडा करण्यासाठी राजाने त्यांना भर सभेत उभे केले. सभेमध्ये सर्वांसमक्ष महादेवी म्हणू लागल्या, माझा पती फक्त महादेव आहे. तेव्हा राजाचा क्रोध अनावर झाला आणि तो म्हणाला, तुमचा विवाह जर दुसर्‍या कुणाबरोबर झाला आहे तर तुम्ही इथे काय करत आहात? चालत्या व्हा इथून.

महादेवी राजाच्या या बोलण्यावर त्याला सोडून तिथून सहज निघून जाऊ लागल्या. तेव्हा राजाला तो स्वतःचा अपमान वाटला. तो गर्जून म्हणाला, महादेवी, तुम्ही जे काही अंगावर वस्त्र दागिने घातले आहेस ते सर्व माझ्या मालकीचे आहेत. ते सर्व घेऊन कुठे जात आहात? ते सर्व सोडून मग तुम्ही जा.

लोकांनी भरलेल्या त्या राजसभेत अठरा वर्षांची युवती असलेल्या अक्का महादेवींनी कुठलाही विचार न करता सर्व दाग-दागिने उतरवून तेथे ठेवले आणि राजदरबारातून बाहेर पडल्या. मोठमोठ्या पंडित सभेत, जंगल-वनात फिरल्या. खूप लोकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. असे फिरण्याने तुम्हाला त्रास होईल; परंतु त्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. राजमहालातून बाहेर पडल्यानंतर विविध संत पंडितांबरोबर ज्ञानसभेमध्ये त्यांच्या भक्ती चर्चाने, वादविवादाने मोठमोठे ज्ञानी संत चकित झाले.स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायाच्या विचाराने महादेवींच्या कवीमनाने मानवमुक्तीच्या आकाशात स्वच्छंद विहार करण्याचे सामर्थ्य मिळवले होते.

त्या म्हणत, स्त्री-पुरुषांमध्ये निसर्गतः असणारे शरीरभेद वगळता दोघेही समान आहेत. स्त्री आणि पुरुषांना समान धार्मिक इतकेच काय साहित्यिक-सांस्कृतिक-आर्थिक-राजकीयदेखील अधिकार हवे. एका वचनात ज्ञानाविषयी त्या म्हणतात,

ज्ञान असे भानुपरी, भक्ती भानुकिरणांपरी.किरण नसती भानुविना, भानू नसे किरणांविना. मग ज्ञानाविन भक्ती अन् भक्तीविना ज्ञान कसे असू शकेल, चेन्नमल्लिकार्जुना?

उडतडीहुन निघून कल्याणनगरीतील शरण संकुलातील अल्प वास्तव्य वगळल्यास अक्कांनी बहुतेक सगळे आयुष्य रानावनात एकटीने भटकण्यात घालवले. तर उत्तरायुष्य त्यांनी श्रीशैलावरच्या कर्दळीबनात काढले. महादेवींचे आई-वडील कर्दळी बनात त्यांना घ्यायला आले होते. परंतु त्या गेल्या नाही. पुढील संपूर्ण जीवन प्रवासात त्यांनी पशुपक्षी, वृक्षवल्लींसोबत संवाद साधला. निसर्ग होऊन प्रकटलेल्या परशिवाशी त्यांचा असणारा संग पदोपदी वाढत जाऊन ऐक्यात सामाविला. म्हणूनच सार्‍या निसर्गातून झालेल्या ईश्वरीय साक्षात्काराचा दिव्य स्वर त्यांच्या वचनांमधून ऐकू येतो.

प्रभू, तूच असशी रे वन सारे,वनातील सारे देवतरु तूच रे, वृक्षराजीत विहरणारे खग-मृग सारे तूच रे.

- Advertisment -

ताज्या बातम्या