मुंबई । Mumbai
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने आज शिवस्मारक शोधमोहीम सुरु केली आहे. २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिवस्मारकाचे जलपूजन केले होते.
परंतु अजूनही त्या स्मारकाचे काम सुरु झाले नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वशंज आणि स्वराज्य पक्षाचे नेते संभाजीराजे संतप्त झाले आहे. त्यांनी रविवारी अरबी समुद्रात जाऊन स्मारकाची पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रात आणि राज्यात तुमचे सरकार मग स्मारक का होत नाही? सरदार पटेल यांचा पुतळा उभा राहिला पण छत्रपतींचा अजून का उभा राहिला नाही? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहे.
कोणत्याही प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन होते तेव्हा सर्व परवानग्या असणे गरजेचे होते. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यासाठी करोडो रूपये खर्च केले गेले. मग कुठे आहे हे स्मारक? त्यामुळे आम्ही स्मारकाच्या शोधसाठी मोहीम आम्ही काढली आहे. राज्यातील १३ कोटी जनतेला सरकारने उत्तर द्यावे. आम्ही कायदा हातात घेणार नाही, असे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले.
स्मारकाच्या ठिकाणी असलेले आमचे बोर्ड काढून टाकले आहेत. परंतु महायुतीचे बोर्ड तसेच आहेत. आम्ही समुद्रात स्मारकाच्या पाहणीसाठी जाणार आहोत. परंतु ज्या बोटने जाणार आहोत, त्या बोटवाल्यांना भाजपकडून धमक्या दिल्या जात आहेत. त्यांना परवाना रद्द करण्याची धमकी दिली गेली आहे. ही कसली दडपशाही? असे ते म्हणाले.
आम्ही ५००० तिकीट काढले आहेत. समुद्रावर दुर्बिण घेऊन जाऊ. पोलिसांच्या म्हणणं ऐकून घेऊ, असे छत्रपती संभाजीराजेंनी म्हटलंय. आम्ही खाकीचा आदर करतो. कोणताच कायदा मोडला नाही. तुम्ही चुकीचे आहात, असं सरकारने सांगाव. मी परत जायला तयार आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे खोटं चालणार नाही, असे ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले यांच्या संवर्धनासाठी सरकारने पुढाकार घ्यायला पाहिजे होता, पण तो घेतला जात नाही, असं म्हणत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, गडकोट आणि किल्ल्यांसह त्यांच्या संवर्धनासाठी सरकारने ४५० कोटी देण्याची घोषणा केलीय. मात्र त्यातील किती पैसे आलेत आणि किती गड-किल्ल्यांचं संवर्धन झालंय, याचं उत्तर सरकारनं द्यावं. आमचे जे कार्यकर्ते आहेत. त्यांनी कसली हुकूमशाही केली? हुकूमशाही तर पोलिसांनी केलीय, असंही संभाजीराजे छत्रपती म्हणालेत.
दरम्यान, ज्या ठिकाणी महाराजांच्या स्मारकांचे जलपूजन झालंय. त्या ठिकाणी ५० कार्यकर्त्यांसह संभाजीराजे पाहणीसाठी गेलेत, यासाठी पोलिसांनी परवानगीसुद्धा दिलीय.