कोल्हापूर | Kolhapur
दरवर्षी ६ जून रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. या सोहळ्याला देशभरातून हजारो शिवप्रेमी उपस्थित राहताता. मात्र रायगडावर साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा हा ६ जून रोजी साजरा करण्याची पद्धत बंद करून हा सोहळा तिथीनुसार साजरा करावा, असे विधान संभाजी भिडे यांनी केले आहे. दरम्यान, भिडे यांनी वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरूनही भाष्य केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक पार पडला होता. त्यामुळे ६ जून रोजी रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा पार पाडला जातो. तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी येतो. त्याप्रमाणे शिवराज्याभिषक सोहळा साजरा करावा, अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली. स्वातंत्र मिळून ७६ वर्षे झाली तरीसुद्धा आपण आपले मानसिक अधिष्ठान हे ब्रिटिशांच्या अधीन ठेवलेले आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा तिथीप्रमाणेच झाला होता. त्यामुळे त्याचा स्मरणदिन हा तिथीप्रमाणेच व्हायला पाहिजे, असे संभाजी भिडे म्हणाले.
तसेच, भिडे यांनी वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरूनही भाष्य केले आहे. रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढायला नको, असे विधान संभाजी भिडे यांनी केले. या कुत्र्याचे राजकारण करू नये, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, इतिहास संशोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत भिडे यांनी वाघ्या कुत्र्याबद्दल जे इतिहास संशोधक बोलतात ते कोणत्या उंचीचे आहेत? अशी विचारणा केली. याबाबत एक स्वतंत्र इतिहास संशोधक मंडळ स्थापन करून त्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली.
वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी
दरम्यान, रायगडावर असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी ३१ मे पर्यंत हटवा अशी मागणी करणारे पत्र संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. या श्वानाबाबत इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी माहिती दिली आहे. रायगडावरील वाघ्या या कुत्र्याची समाधी हटवण्यात यावी अशी मागणी याआधी शिवप्रेमींनीही केली आहे. मात्र ही समाधी हटवण्यात आलेली नाही. संभाजीराजे छत्रपती यांनी पत्र लिहून ही समाधी कपोलकल्पित असून ती हटवावी अशी मागणी केली आहे.
वाघ्या कुत्र्याचा काय आहे वाद
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर वाघ्या या पाळीव कुत्र्याने त्यांच्या समाधीत उडी घेतल्याचे म्हटले जाते. परंतु याबाबत इतिहास तज्ज्ञांमध्ये एकवाक्यता नाही. त्याबाबत वेगवेगळे दावे केले जातात. काही जण ही दंतकथा असल्याचे सांगतात. त्यामुळे संभाजी राजे यांनी या वाघ्या कुत्र्याचे शिल्प हटवण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र लिहून केली होती. धनगर समाजाकडून वाघ्या कुत्र्याचे शिल्प हटवण्यास विरोध केला जात आहे. या वाघ्या कुत्र्याच्या शिल्पासाठी १९०६ मध्ये इंदूरचे राजे तुकोजी होळकर यांनी देणगी दिली होती.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा