Saturday, July 27, 2024
Homeनगरशिवसेनेच्या गटबाजीची पक्षप्रमुखाकडे तक्रार

शिवसेनेच्या गटबाजीची पक्षप्रमुखाकडे तक्रार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहर प्रमुखच गटबाजीला खतपाणी घालत असून हे असंच सुरू राहिलं तर शिवसेना शहरातून हद्दपार होण्यास वेळ लागणार नाही.

- Advertisement -

गटबाजीचे राजकारण करणार्‍या शहर प्रमुख बदलून नवीन शहरप्रमुख नियुक्त करावा, अशी मागणी नगरसेवक गणेश कवडे यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

कवडे यांच्या या पत्रामुळे शिवसेनेतील गटबाजीची धग अजूनही सुरूच असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. शिवसेनेतंर्गत गटबाजी स्व. अनिल राठोड यांच्या निधनानंतर उफाळून आली.

मंत्री शंकरराव गडाख यांनी त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच बैठकीत शहर प्रमुखाच्या गटाने एकजुटीची भूमिका घेतली नसल्याची माहिती कवडे यांनी मातोश्रीवर पाठविलेल्या तक्रारीत दिली आहे.

संपर्कप्रमुख व शिवसेनेचे नगरसेवक हे वरिष्ठांचे आदेश पाळणारे सच्चे शिवसैनिक आहेत. संघटनावाढीसाठी एकजुटीने प्रयत्न केले. परंतू शहर प्रमुख व त्यांच्या गटातील काही नगरसेवक पक्षात मनमानी करत आहेत. स्थानिक पातळीवर इतर नगरसेवक व कार्यकर्त्यांना विचारात न घेता स्वत:चे निर्णय अंतिम मानत असल्याचा आरोप कवडे यांनी केला आहे.

गटबाजी विरोधात शहर प्रमुख हे कुठलही कठोर भूमिका घेत नाहीत. या गटबाजीमुळे नगर शहरातून शिवसेना हद्दपार होण्याची भिती आहे. त्यामुळे सच्चा शिवसैनिक म्हणून यासंदर्भात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, सचिव मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई यांच्याकडे तक्रार पाठविली असल्याचे कवडे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या