अहमदनगर | Ahmednagar
एकनाथ शिंदे समर्थक नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद कोणत्या ना कोणत्या कारणावरुन नेहमी चर्चेत असतात. आता त्या एका नव्या कारणाने चर्चेत आल्या आहेत. दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे.
इतकच नव्हे तर दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले आहे, असा गंभीर आरोप त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. अहमदनगर येथे आज शिंदे यांनी पत्रकार परिषदेत हा खुलासा केला.
दीपाली यांचे पाकिस्तान बॅंक खाते असल्याचा दावा देखील भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. दीपाली सय्यद यांच्या या संबंधांविषयी भाजपच्या दिग्गजांना माहिती आहे. मात्र आर्थिक हितसंबंधांमुळे त्यांना पाठिशी घालण्याचा प्रकार सुरु आहे, असा गंभीर आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामदास आठवले हे नेते दिपाली सय्यद यांना पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचा दावा देखील भाऊसाहेब शिंदे यांनी केलाय. दिपाली सय्यद यांच्याबरोबर रामदास आठवले आणि नितीन गडकरी यांचे आर्थिक संबंध आहेत, असा आरोप करण्यात आलाय.
तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे अनेक वेळा लेखी तक्रार करून आणि पुरावे देऊनही दिपाली सय्यद यांच्यावर कारवाई होत नाही, असा मोठा आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केलाय.
दरम्यान दिपाली भोसले सय्यद यांचा जन्म १ एप्रिल १९७८ साली बिहारमध्ये झाला. बिहार येथूनच त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. सीव्हीआर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. समाज माध्यमांतील वृत्तानुसार त्यांनी नालंदा विद्यापीठातून फाइन आर्ट्सचे शिक्षण पूर्ण केले आहे.
दीपाली सय्यद यांनी २०१४ मध्ये अहमदनगर जिल्ह्यातून आम आदमी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता. यानंतर काही दिवसांनी दीपाली सय्यद यांनी शिवसंग्राम या पक्षात प्रवेश केला होता.
दिपाली सय्यद यांनी २०१९ ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ठाणे जिल्ह्यातील मुंब्राकलवा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर लढवली होती पण त्यांना येथेही पराभवाचा सामना करावा लागला होता.