जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :
शहरातील विविध भागात रस्तेची पुरती वाट लागली आहे. गेल्या आठदिवसांपासून संततधार पावसामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडून रस्ते चिखलमय झाले आहेत.
शिवाजीनगरला आतिशय चिखलमय रस्ते झाले आहे. चालायला सुद्धा रस्ता नाही. गेल्या दोन वर्षांपासून शिवाजीनगरच्या नागरिकांना या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याविरोधात शिवाजीनगर शिवसेनेच्या विभाग प्रमुख विजय बांदल यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी भाजपाचे स्थानिक नगरसेवक नवनाथ दारकुंडे आणि नगरसेविका गायत्री शिंदे यांच्या घरी चिखलातून पायी चालत जाऊन चिखलमय मोर्चा काढून निवेदन दिले. तसेच चिखलामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा द्यावा, अशीही मागणी शिवसैनिकांनी केली.
संततधार पावसामुळे प्रभागातील शिवाजीनगर, धनाजी काळे नगर, भुरेमामलेदार प्लॉट, हनुमान सॉमिल ते लाकूड पेठ गल्ली, क्रांती चौक ते शिवाजी नगर हुडकोतील संपूर्ण परिसर हा चिखलाने व गटारीच्या सांडपाण्याने तुंबला आहे. चिखलामुळे नागरिकांना रस्त्यावर चालणे देखील कठीण झाले आहे. या चिखलामुळे दुचाकी वाहने घसरुन अपघात होत असून तुंबलेल्या पाण्याने नारिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डेंग्यू, मलेरिया सारखे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात असून या रस्त्यांची लवकरात लवकर रस्ता दुरुस्ती व गटारींची स्वच्छता करावी, अशी मागणी करण्यात आली.
यामोर्चात शिवाजीनगर शिवसेना विभाग महिला वर्ग व माजी नगरसेवक अंकुल कोळी, प्रवीण पटेल, शिवसैनिक मोहन जाधव, शाखाप्रमुख कैलास गायकवाड, राजू सय्यद, राजू जाधव, किरण ठाकूर, लखन पवार, दत्तात्रय बांदल, विनोद तायडे, चेतन बांदल, सतीश बांदल आदींसह कल्पना चोरटे व वार्डातील महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. शिवाजीनगरातील भाजपचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे, गायत्री शिंदे यांच्या घरी चिखलमय रस्त्यावर मोर्चा काढण्यात आला.