मुंबई | Mumbai
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Elections) भारतीय जनता पक्षाने (BJP) ७० पैकी ४८ जागा जिंकत मोठा विजय मिळवला. तर ‘आप’ला केवळ २२ जागांवर समाधान मानावे लागले. या मोठ्या विजयानंतर तब्बल २७ वर्षांनी दिल्लीत भाजपचे कमळ फुलले आहे. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसला (Congress) एकही जागा जिंकता आली नाही. तर ‘आप’ला देखील सत्ता गमवावी लागली. त्यानंतर आता या पराभवाचे विश्लेषण करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेससह इंडिया आघाडीच्या नेत्यांसह भाजपवर (BJP) निशाणा साधला. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देखील टोला लगावला आहे.
यावेळी बोलतांना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की,”महाराष्ट्रानंतर (Maharashtra) दिल्लीचे (Delhi) निकाल आले असून त्यात आप आणि काँग्रेस एकत्र लढले असते तर निकाल वेगळा लागला असता हे आकडे सांगत आहेत. आता लढायचा की एकत्र यायचे याचा विचार नेत्यांनी करायला हवा, याविषयीची भूमिका सगळ्यांनी घेणे आवश्यक आहे. नाहीतर देशात आणि राज्या-राज्यात जे काही चालु आहे त्याला आपण सगळ्यांनी मिळून मान्यता द्यावी”,असे म्हणत त्यांनी इंडिया आघाडीच्या (India Alliance) नेत्यांना टोला लगावला.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, “लोकशाहीमध्ये निवडणुका होत असतात, निवडणुकीत जय-पराजय होत असतात. मात्र, गेल्या १० वर्षांपासून निवडणुका लोकशाही पद्धतीने लढल्या जात नाहीत. निवडणुका सैतानी पद्धतीने लढल्या जात आहेत. आम्हाला जिंकायच आहे, आम्हाला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचा आहे. त्यासाठी मग साम, दाम, दंड, भेद अशा सर्व गोष्टींचा वापर केला जातो. मतदार याद्यांमधील (Voter List) घोटाळा महाराष्ट्रात पाहिला तोच आपल्याला दिल्लीत दिसतो आहे. उद्या बिहारमध्ये हेच दिसेल. असाच प्रकार हरियाणातही दिसला. पण आता या सर्वांचा बाऊ न करता पुढल्या लढाईसाठी विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं आहे”, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
तसेच आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) पराभवानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली होती. यावर देखील राऊतांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की,”अण्णा हजारे काय म्हणतात त्याला काही अर्थ राहिला नाही. ते अचानक जागे होतात. महाराष्ट्रात एवढा भ्रष्ट्राचार झाला, लोकशाहीवर हल्ले झाले तरीही अण्णा हजारे यांनी कधीही हालचाल केली नाही. मात्र, दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाने अण्णा हजारे यांना आनंद झाला. त्यांच्या चेहऱ्यावर मी काल आनंद पाहिला, हे लोकशाहीला मारक आहे. गेल्या १० वर्षांत देशात अनेक संकटे आली, देश लुटला जात आहे. अनेकांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप झाले ते आज सर्व भाजपाबरोबर आहेत. मग अण्णा हजारे यांना त्याबाबत मत व्यक्त करावं असं वाटत नाही का? त्यामागचं रहस्य काय आहे? दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या पराभवाचा आनंद अण्णा हजारे किंवा काँग्रेसला झाला असेल तर याचं दु:ख वाटतं. कारण अरविंद केजरीवाल जरी निवडणूक हरले असले तरी भाजपा विजयी झाली आहे” असे संजय राऊत म्हणाले.
अमित शाह एकनाथ शिंदेंचे ऑपरेशन कधी करतील ते त्यांनाही कळणार नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याबाबत विधान केले होते. तसेच त्यांनी एकनाथ शिंदेंच्या नाराजीवरही भाष्य केले होते. यावर राऊतांनी वक्तव्य करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) टोला लगावला आहे. तसेच फडणवीस यांच्यावर देखील टीका केली आहे. ते म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांचे ऑपरेशन अमित शाह कधी करतील, ते त्यांनाही कळणार नाही. अमित शहा (Amit Shah) यांनी शब्द पाळला असता, तर ती घडामोड झाली नसती. २०१९ ला आम्ही चर्चा केली असं ते म्हणत आहेत. मग २०१४ ला काय झालं होतं? तेव्हा भाजपाने का युती तोडली होती? शिवसेनाप्रमुख नाहीत या आनंदात भाजपने निवडणुका लढवल्या. देवेंद्र फडणवीस यांना विजयाचा हॅग ओव्हर झाला आहे किंवा ते सतत विजय पाहून डिपरेस झाले आहेत. आम्ही खुर्चीसाठी लढत होतो असं ते म्हणतात. आम्ही खुर्चीसाठी लढत होतो तर ते कशासाठी लढत होते. महाराष्ट्रातील सरकार ही येड्याची जत्रा आहे. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गेल्यानंतर फडणवीस यांचा तो चेहरा पाहिला आहे. ज्यांची खुर्ची गेली ते कसे रुसुन बसत आहेत तेही आम्ही पाहत आहोत”, असे म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.