मुंबई | Mumbai
राज्यात सध्या चौथ्या टप्प्याच्या मतदानासाठी जोरदार तयारी सुरु आहे. येत्या २० मे ला राज्यात चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडणार असून राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप पहायला मिळत आहे. देशातील प्रमुख नेत्यांच्या उमेदवारांसाठी सभा होत आहे. आज शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा महराष्ट्रात येत असून मुंबईत त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील त्यांच्यासोबत असणार असल्याने दोघेही पहिल्यांदाच एकत्र येत आहे. या सभेवरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे.
पंतप्रधान मोदी या निवडणुकीत जवळपास २५ वेळा राज्यात येऊन गेले आहेत. “विकास केला असता, महाराष्ट्रासाठी चांगल्या गोष्टी केल्या असत्या तर तुम्हाला शिव्या घातल्या, महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही म्हणून सांगितले त्यांना आज मांडीवर बसवावे लागले नसते”, अशी टीका त्यांनी केली.
काय म्हणाले संजय राऊत
“आज भाजपाच्या मांडीला मांडी लावून जे (राज ठाकरे) बसत आहेत, ते स्वतःला महाराष्ट्राचे स्वाभिमानी वैगरे म्हणतात आणि त्यासाठी पक्ष स्थापन केला असेही सांगत होते. ते महाराष्ट्राच्या शत्रूंच्या बरोबर व्यासपीठावर बसतात आणि त्यांच्याबद्दल कौतुकाची फुले उधळणार, हे चित्र महाराष्ट्राला याची देही याची डोळा आज दिसेल. म्हणूनच आम्ही म्हणतो, या निवडणुकीनंतर सुपारीची काही दुकाने बंद होणार आहेत. यापैकी त्यांचेही एक दुकान असणार आहे”, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
तसेच “आज इंडिया आघाडीचीही बीकेसी मैदानावर सभा होईल. खरे म्हणजे शिवतीर्थावर आमची सभा व्हावी यासाठी आम्हीच पहिला अर्ज केला होता. आमची तिथे सभा होण्याची परंपरा आहे. पण केवळ आमची सभा होऊ नये म्हणून पंतप्रधान आणि काही सुपारीबाजांना बोलावण्यात आले. सत्तेचा गैरवापर केला गेला. पण ठिक आहे. आमच्या सभेत त्याचे उत्तर देऊ.” या सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे उपस्थित राहतील. तसेच उद्या महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होईल,” अशी माहितीही यावेळी संजय राऊत यांनी दिली.