मुंबई | Mumbai
‘शिवसैनिकांनो, वाघांनो, संघठित व्हा, महाराष्ट्राच्या विकासाला गतीशील बनवा’. ज्याला मंत्रिपद नको, आमदारकी, खासदारकी नको. कुठलेही पद नको अशा आशयाचे बॅनर नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदना बाहेर लावण्यात आले असून दोन्ही शिवसेनेला एकत्र येण्याचे आव्हान करण्यात आले आहे. या बॅनर्सची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. यावरुनच बोलताना शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी अत्यंत महत्वाचे विधान केले आहे.
काय म्हणाले संजय शिरसाट?
“आजही आम्हाला वाटते की कोणीतरी पुढाकार घ्या. म्हणा एकदा आपण शिवसेना प्रमुखांच्या भूमिकेत जाऊ त्यांची भूमिका घेऊन पुढे जाऊ, आम्हाला आनंद होईल. राजकीय स्वार्थासाठी आम्ही बाहेर गेलो नाही. आमच्या राजकीय भवितव्यासाठी हा उठाव केलेला नाही. एका विचाराने एकत्र येणार असाल. त्यांनी एक पाऊल पुढे टाकले आम्ही दोन पाऊल पुढे टाकू, पण ते टाकणार नाहीत. ते करंटे लोकांच्या आहारी गेले आहेत,” असे संजय शिरसाट म्हणालेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी कधीही खुर्ची घेऊ दिली नसती. सर्वसामान्य शिवसैनिकाला दिली असती. खुर्चीसाठी कुणी तडजोड करायचं ठरवलं तर त्याला नाईलाज आहे. त्यामुळे आम्ही केलेला उठाव होता. आता आम्ही कितीही पाऊले पुढे टाकली तरी त्यांना वाटेल हे मजबूर झाले आहेत. त्यांना कुणी विचारत नाही म्हणून पुन्हा धावपळ सुरू झाली म्हणून आम्ही त्या भानगडीत पडत नाही. आम्ही आहोत तिथे चांगल्या मजबूतीने उभे आहोत. शिवसेनाप्रमुखांचे विचार पुढे घेऊन चाललो आहोत असंही संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.
“कमी आमदार मोठी सत्ता ही एकनाथ शिंदे यांची शिकवण आहे. आम्हाला दुसरे खातं मिळेल अशी माहिती आहे. ही पहिल्या स्टेजला केलेली ऍडजेस्टमेंट आहे. सरकार स्थिरपणे व्हावे आणि शंभर दिवसाचा कालावधी पूर्ण व्हावा, जेव्हा पूर्णविस्तार होईल त्यावेळेस अनेक चेहरे त्या मंत्रिमंडळात दिसतील,” असा विश्वासही संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.