सांगली | Sangli
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्ष एकमेकांना लक्ष्य करताना दिसत आहे. शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी भाजपाच्या स्थानिक नेत्यावर घणाघाती टीका करताना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. विटा-खानापूरचे आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे,आमच्यासारखे 242 आमदार आहेत, म्हणून मुख्यमंत्री आहेत.
सांगली जिल्हा परिषद निवडणुकी निमित्त खानापूर तालुक्यातील करंजे जिल्हा परिषद गटातील पळशी येथे आयोजित सभेतून आमदार सुहास बाबरांनी हे विधान केले आहे. तसेच तालुक्यातील काँग्रेस,राष्ट्रवादी शरद पवार, अजित पवार पक्ष,ठाकरे गट आणि भाजपा आपण चालवतो,असे देखील आमदार बाबर यांनी सांगितले. विट्याचे माजी नगराध्यक्ष भाजपाचे नेते वैभव पाटील यांच्यावर टीका करताना आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत भाष्य केले आहे.
माझ्यासारखे २४२ आमदार आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री
माझ्यासारखे २४२ आमदार आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री आहे आणि मुख्यमंत्र्यांना एकदा जाऊन विचार सुहास बाबर कोण आहे ते, मुख्यमंत्री याचे उत्तर देतील असे म्हणत एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी विरोधी गटातील भाजपच्या नेते पदाधिकाऱ्यांना आव्हान दिले.
मी दिसतो शांत पण कार्यक्रम करायला लागलो तर
भाजपच्या काही नेत्यांनी कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेचे आमदार सुहास बाबर यांच्यावर टीका केली होती. या टीकेला सुहास बाबर यांनी प्रत्युत्तर दिले.आज सुहास बाबर खानापूर आटपाडीमधील काँग्रेस, शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे शिवसेना, उद्धव ठाकरे शिवसेना आणि भाजप पण चालवतो, मी दिसतो शांत पण कार्यक्रम करायला लागलो तर विट्यात मी काय केलंय हे माहित आहे असेही सुहास बाबर म्हणाले. खानापूर तालुक्यात जिल्हा परिषदेने पंचायत समिती निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहोचल्याने भाजप आणि शिंदेसेनेच्या नेत्यांमध्ये एकमेकावर जोरदार टीका होत आहे.
आज आम्ही २४२ फिरतोय त्याच्या अवतीभोवती
“एवढं सोप्पं नाही. राजकारण जेवढं म्हणतात तेवढं सोप्पं नसतं. आज आम्ही २४२ फिरतोय त्याच्या अवतीभोवती. तुझा कोणताही नेता घेऊन जा आणि सुहास बाबर जाऊ दे. नाही मला आत घेतलं आणि तुझ्या नेत्याला बाहेर बसवलं, तर… तुझा तर संबंधच येत नाही”, असे आव्हान आमदार बाबर यांनी भाजपाच्या स्थानिक नेत्याला दिले.





