मुंबई | Mumbai
शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यावरुन राज्यात राजकीय चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया येत आहेत. याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरेंनी संदेश दिलाय की, आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे. आपल्याला भविष्याचा विचार करायचा आहे. तुम्ही कोणीही या संदर्भात वेगळी भूमिका मांडायची नाही. चार भिंतीमध्ये आपण बोलू शकतो. पण, हा नवीन प्रवाह सुरू होत आहे. तो प्रवाह गढूळ करण्याचे काम आम्ही आमच्याकडून कदापि करणार नाही.
ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत संजय राऊत पुढे म्हणाले, दोन प्रमुख नेत्यांनी एकत्र येण्याबाबत भूमिका मांडल्या आहेत. त्यानंतर काही लोकांना वेदना होणार आहे. त्यांच्या पोटात मळमळ होत असले, त्याकडे आम्ही दुर्लक्ष करत आहोत. कारण त्या लोकांना कायमचे शेतात जावे लागले. संघाच्या शाखेत जावे लागले, अशी भीती त्या लोकांना आहे.
पुढे ते म्हणाले, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचे राजकारण आणि राजकारणाची सूत्र हातात घेतली पाहिजे, ही आतापर्यंत लोक भावना आहे. महाराष्ट्राच्या मनात जे आहे ती भावना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही व्यक्त केली. दोघांनीही आपापल्या भूमिका मांडल्या आहेत. जेव्हा दोन प्रमुख नेते अशा भूमिका मांडतात, तेव्हा त्या आपण गांभीर्याने घेतल्या पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे.
मनसेकडून शिवसेनाचा जुना इतिहास सांगितला जात आहे. त्यावर संजय राऊत यांनी भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी स्थापन करण्यापूर्वी एकमेकांवर प्रचंड टीका करत होतो. परंतु आम्हाला एकत्र यायचे होते, तेव्हा आम्ही भूतकाळ पाहिला नाही. जेव्हा राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी हातमिळवणी करतो तेव्हा भूतकाळ कशासाठी पाहावे. आम्हाला महाराष्ट्राचे भवितव्य घडावायचे आहे, हे दोन नेत्यांमध्ये ठरले आहे. आमचा दृष्टीकोन सकारात्मक आहे.
महाराष्ट्राने सातत्याने बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर मनापासून प्रेम केले आणि आजही करत आहे. पिढ्या बदलल्या, पण हे प्रेम काही कमी होत नाही. त्यामुळे अनेकांना भीती वाटत असेल. त्यातून त्यांची काही पोटातून मळमळ बाहेर पडत असेल. त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. आम्ही सकारात्मक दृष्टीने याकडे पाहत आहोत. महाराष्ट्रात काही चांगले घडावे. महाराष्ट्राने एकत्र येऊन हुकूमशाही विरुद्ध कायम लढे दिलेले आहेत. चले जाव आंदोलनाची ठिणगी या मुंबईत पडली. त्यामध्ये मराठी माणूस पुढे होता, असे संजय राऊत यांनी म्हटले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा