सिंधुदुर्ग | Sindhudurg
मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) नेते मैदानात उतरले असून आज मालवण (Malvan) बंदची हाक देण्यात आली होती. त्यानंतर मविआच्या या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र, अशातच आज ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर पाहणी करण्यासाठी आले असता त्याचवेळी खासदार नारायण राणे हे देखील त्याठिकाणी पाहणी करण्यासाठी आले. यावेळी पाहणी दौऱ्यादरम्यान प्रवेशद्वारावरच ठाकरे आणि राणे समर्थक भिडल्याचे पाहायला मिळाले.
हे देखील वाचा : Nashik Crime News : छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे पाहणी करण्यासाठी आले असता राणे समर्थकांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच राणे समर्थक आदित्य ठाकरेंवर धावून गेल्याचे सांगितले जात आहे. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळे केले. यावेळी काही कार्यकर्त्यांना मारहाण देखील झाली. तसेच किल्ल्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असताना भाजपा नेते निलेश राणे यांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमक झाली. तर नारायण राणे (Narayan Rane) यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दमदाटी केल्याचे बोलले जात आहे.
हे देखील वाचा : संजय राऊतांचा मंत्री केसरकरांवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले, थेट बुटाने मारले पाहीजे…
दरम्यान, या घटनेनंतर माध्यमांशी बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, २४ वर्षाच्या मुलाला कंत्राट कोणी दिले? ते फरार आहे त्याला पळून जाण्यासाठी कोणी मदत केली? पीडब्ल्यूडीचे मंत्री आहेत त्यांच्यावर एफआयआर दाखल झाली आहे का? हे अत्यंत दुर्दैवी आहे.मी येत असताना राडा झाला. पत्रकारांना धक्काबुक्की झाली. मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे की, महाराजांच्या किल्ल्यांमध्ये आपल्याला राजकारण करायचे नाही म्हणून मी कार्यकर्त्यांना देखील अडवले आहे. या बालीशपणात मला पडायचे नाही, असे त्यांनी म्हटले.
हे देखील वाचा : शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे ‘नॉट रिचेबल’
यापुढे पोलिसांशी असहकार्य असेल – राणे
यावेळी पोलिसांनी नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांना राजकोट किल्ल्यावर थांबवून ठेवले होते. त्यामुळे नारायण राणे यांनी पोलिसांशी असहकार्य करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच यापुढे जिल्ह्यातील पोलिसांशी असहकार्य असेल”, असा इशाराच त्यांनी पोलिसांना (Police) दिला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा