मुंबई | Mumbai
प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ‘मराठी माणसांसाठी आमच्यातील वाद किरकोळ असून मी महाराष्ट्राच्या हितासाठी माझा इगो बाजूला ठेवून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करण्यास तयार आहे, असे म्हटले होते.
त्यानंतर राज ठाकरेंच्या या आवाहनाला प्रतिसाद देतांना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) एका कार्यक्रमात बोलतांना ‘मी देखील किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे. पण माझी अट एक आहे की, महाराष्ट्राच्या हिताच्या जो आड येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याच्या पंगतील बसणार हे आधी ठरवा’, असे म्हटले होते. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलतांना यावर आणखी भाष्य केले.
यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे रक्ताचे आणि मैत्रीचे नाते आहे.’एसशिं’ नावाचा पक्ष अमित शाह महाराष्ट्रात चालवत आहे. आमच्यासाठी ते महाराष्ट्राच्या (Maharashtra) हिताच काम करत नाहीत. ते राज ठाकरे यांचा वापर करून मराठी माणसाला पडद्याआडून त्रास द्यायचे काम करत आहेत. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता पुढे काय होईल, ते पाहू, असे त्यांनी म्हटले.
तसेच “मी उद्धव ठाकरेंशी सकाळी आणि रात्रीही चर्चा केली. राज ठाकरेंसोबतच्या युतीच्या याविषयावर मी त्यांच्याशी बोललो. आम्ही हवेत बोलत नाही. ही मुंबई आणि मराठी माणूस त्याचा व्यवसाय आणि व्यवहारावर कोणी घाव घालत असेल तर एकत्र यावेच लागेल. राज ठाकरे यांच्याकडून चांगली भूमिका आली असेल तर ती नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही,” असे म्हणत आम्ही मनसेसोबत (MNS) युती करण्यास तयार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.