मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात तणाव निर्माण झाला होता. दोन्ही देशांकडून एकमेकांवर प्रतिहल्ले सुरु होते. अखेर काल (शनिवारी) अमेरिकेच्या (America) मध्यस्थीने दोन्ही देशांत शस्त्रसंधी थांबवत युद्ध थांबविण्यात आले. त्यामुळे दोन्ही देशांमधील आगामी काळातील हे युद्ध टळले आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मध्यस्थी केल्यानंतर भारत-पाकिस्तानात शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे. यावरुन आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना जोरदार टीका केली आहे.
यावेळी ते म्हणाले की, “डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली असे सांगितले जात असून, हे चुकीचे आहे. तुम्ही जर व्हाईट हाऊसचे निवेदन पाहिले किंवा ट्रम्प यांचे ट्वीटर अकाऊंट चेक केले तर भारताने (India) डोनाल्ड ट्रम्प यांच्या विनंतीवरुन युद्धबंदी स्वीकारल्याचे दिसत आहे. आमची माणसे मेली असून २६ महिलांचा सिंदूर पुसला आहे. मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प हे कोणत्या अधिकाराने मध्यस्थी करत आहेत”, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.
पुढे ते म्हणाले की, “भारत हा एक सार्वभौम आणि स्वतंत्र राष्ट्र असून, १४० कोटी लोकसंख्येचे महान राष्ट्र आहे. ट्रम्प सांगतात आणि आपण शस्त्रविराम करतो. काय आहे कारण? भारताला काय मिळालं? पुरा बदला लेंगे, छोडेंगे नही ही भाषा मोदींनी केली होती. पाकिस्तानचे तुकडे करणार होते त्याचं काय झालं? भारताची बेअब्रू झाली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांची प्रतिक्रिया आली आहे की आम्ही युद्ध जिंकलो. भारताच्या पंतप्रधानांना (Prime Minister) हे शोभत नाही. कोणत्या अटी शर्थीवर शस्त्रविराम दिला? हे सर्वपक्षीय बैठकीत सांगा. या बैठकीसाठी पंतप्रधान मोदींनी उपस्थितीत राहायला पाहिजे”, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.
तसेच “पाकिस्तानला (Pakistan) कायमचा धडा शिकवण्याची संधी होती तरीही देशाच्या राजकीय नेतृत्वाने अचानक कच खाल्ली आणि सैन्याचे तसेच देशाचे मनोबल उद्ध्वस्त केले. कुणासाठी तर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी. त्यांचा आपल्या देशाशी काय संबंध आहे? सार्वभौम राष्ट्राने हा निर्णय का घेतला? २६/११ चा हल्ला झाल्यानंतर मोदीच म्हणत होते की देशाचे पंतप्रधान ओबामांकडे जाऊन रडत आहेत. आता मोदी आणि अमित शाह (Amit Shah) ट्रम्पकडे जाऊन रडत आहेत का? दोन्ही देशांतील संघर्ष टोकाला जाऊन पोहचला असताना अवसानघातकी निर्णय कुणाच्या तरी दबावाला बळी पडून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला”, असेही संजय राऊत यांनी म्हटले.