मुंबई | Mumbai
अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून गाजलेल्या मुद्द्यावरुन आज सभागृहात गदारोळ झाल्याचे दिसून आलेले असतानाच शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज अधिवेशन सुरू असताना विधिमंडळ सभागृहात हजेरी लावली. शिवसेना व महाविकास आघाडीतील नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यावर उध्दव ठाकरे यांनी निलम गोऱ्हे, अबु आझमी, आणि शिवसेना शिंदे गटाला टार्गेट केले.
काय म्हणाले उध्दव ठाकरे?
विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. यावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, “अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी खर तर आमच्याकडूनच उशीर झाला. त्यांच्यावर आतापर्यंत कारवाई होऊन त्यांचे आतापर्यंत निलंबन होयला हवे होते.” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, “अविश्वास प्रस्ताव आणल्यावरती या अधिवेशनात आम्हाला चर्चा अपेक्षित आहे. कोणीही नियम आणि कायदेभंग केला असेल तरीही त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. हा अविश्वास ठराव ज्या कारणांसाठी आणला गेला, ती कारणे लवकरच तुमच्या सर्वांसमोर येतील. पण, पक्षांतर हादेखील एक महत्त्वाचा विषय आहे. म्हणून याआधीच हा ठराव आम्ही आणला पाहिजे होता.” असे म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
अबु आझमी यांच्यावर ५ वर्षांसाठी निलंबीत केले पाहीजे
अबू आझमींच्या निलंबनावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, निलंबन कायमचे, 5 वर्षांसाठी केले पाहिजे, ही सरकारची जबाबदारी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. “छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि इतर महापुरुषांविषयी अपशब्द काढणाऱ्यांविरोधात कारवाई झालीच पाहिजे. आमचीदेखील हीच मागणी असणार आहे. त्यामुळे निलंबन किती मिनिटांसाठी, तासांसाठी केले आहे याची कल्पना नाही. पण पुन्हा असे कोणाची बोलण्याची हिंमत होता कामा नये. त्यामुळे सरकारने यावर कठोर कारवाई केली पाहिजे. त्यांचे निलंबन कायमचे करायला हवे.” असे ठामपणे सांगितले आहे.
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले आहे. यावर पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी या निर्णयचा विरोध करत टीका केली. याबद्दल उद्धव ठाकरेंना विचारले असता ते म्हणाले की, “अखिलेश यादव यांना काय आक्षेप घ्यायचा आहे तो घेऊ द्या. संपूर्ण महाराष्ट्राने अबू आझमी यांचा विरोध केला आहे. जर त्यांना असे वाटत असेल तर अखिलेश यादव यांनी त्यांच्याकडून त्यांना तिकीट देऊन निवडून आणावे,” असे म्हणत त्यांनी अखिलेश यादव यांना टोला लगावला आहे. त्यामुळे आता इंडि आघाडीमध्ये याचे काय पडसाद पडतात? याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
गद्दारांना छावा दाखवायलाच हवा
छावा चित्रपट दाखवण्याची संकल्पना मांडली, त्यांचे मी अभिनंदन करतो. संभाजी महाराजांवरील छावा चित्रपट दाखवत आहेत, ते चांगलेच आहे. मात्र, शिवाजी महाराजांवरील चित्रपट देखील दाखवला पाहिजे. सूरतेला पळून गेलेल्यांना दाखवले पाहिजे की, आपल्या महाराजांनी सूरत कशी लुटली होती, त्यांचे शौर्य समजले पाहिजे. मेलो तरी बेहत्तर पण त्यांनी धर्म बदलला नाही, त्यामुळे आपल्या संभाजीराजांचा पिच्चर गद्दारांना दाखवलाच पाहिजे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेत शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा