Saturday, May 4, 2024
Homeनगरऔरंगाबादच्या नामांतराबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी - गिरीश महाजन

औरंगाबादच्या नामांतराबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी – गिरीश महाजन

अहमदनगर (प्रतिनिधी) –

नामांतराच्या बाबतीत शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे. केवळ तेथील निवडणुकासमोर ठेऊन मतदारांना कशा भूलथापा मारायच्या, त्यांना कशी भुरळ टाकायची,

- Advertisement -

त्यासाठी हा सर्व प्रयत्न सुरू आहे. औरंगाबादचे मतदार शिवसेनेवर चिडले असून तेथे पाण्यासाठी लोकांना आठ-आठ दिवस वाट पाहावी लागते. औरंगाबादकरांचे नाराजीवरून लक्ष दूर करण्यासाठी नामांतराचा मुद्दा शिवसेनेने काढला आहे, असा आरोप भाजपचे माजी मंत्री डॉ. गिरीश महाजन यांनी केला.

तसेच तीन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेसंदर्भात खोटी फिर्याद देऊन राजकीय आकसापोटी माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यासंदर्भात माझी कोणत्याही खात्या मार्फत चौकशी करा, असे मी न्यायालयाला सांगितले आहे. जर मी एक टक्का जरी दोषी असेल तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देत राजकीय संन्यास घेईन, असेही महाजन यावेळी म्हणाले.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाजन नगर येथे आले असता, त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. यावेळी माजी आ. स्नेहलता कोल्हे, पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य भानुदास बेरड, शहराध्यक्ष भैय्या गंधे, सुनील रामदासी, सचिन पारखी आदी उपस्थित होते. गिरीश महाजन म्हणाले, आठ डिसेंबर 2018 ची घटना तयार करून माझ्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा बोलवता धनी कोण आहे, हे जळगाव जिल्ह्याला माहिती आहे, असा टोला त्यांनी खडसे यांचे नाव न घेता लगावला. या प्रकरणांमध्ये 30 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणासंदर्भात मी मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला असून याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा. चौकशी करून यातील सत्यता काय आहे, हे समोर येईल. एक टक्का जरी यातील खरे निघाले, तर मी राजकारणातून निवृत्त होईल, असे महाजन म्हणाले. खडसे यांनी कुठे जावे किंवा जाऊ नये ? हा त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे यावर मत व्यक्त करायचे कोणतेच कारण नाही. इडीकडून अनेकांच्या चौकशा सुरू झाल्या आहेत. ईडी आधी चौकशी करते व दोषी आढळ्यानंतरच कारवाई करते. त्यामुळे विनाकारण वक्तव्य करणे चुकीचे आहे. ईडीने ज्यांना-ज्यांना हिशोब मागितला आहे, तो त्यांनी दिला पाहिजे, असे महाजन म्हणाले.

नामांतराच्या मुद्यावर समाचार घेतांना महाजन म्हणाले, शिवसेना सध्या आपली भूमिका रोज बदलत आहे. शिवसेनेची कोणतीही स्वतःची मूल्य राहिलेले नाहीत, शिवसेनेला सध्या कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपदी राहायचे आहे. त्यासाठी त्यांना सर्व पक्षांना सोबत घेऊन जायचे आहे. त्यामुळेच बोलायचे एक आणि करायचे दुसरे, ही भूमिका त्यांची आहे. मागील काळात शिवसेना आमच्यासोबत होती. त्यावेळेस त्यांनी औरंगाबादच्या नामांतराविषयी आग्रह करायचा होता. मात्र त्यावेळी शिवसेना काही बोलली नाही. आता मात्र निवडणुकासमोर बघून मतदारांना कशा भूलथापा मारायच्या, त्यांना कशी भुरळ टाकायची, त्यासाठी हा सर्व प्रयत्न चालवला आहे. शिवसेनेकडे राज्यातील सत्ता आहे, त्यांचे मुख्यमंत्री आहेत. आता त्यांनी औरंगाबादचे नामांतरण संभाजीनगर करण्याबाबत निर्णय घ्यावा, त्याला आमचा पाठिंबा असेल. परंतु शिवसेना दाखवते वेगळे आणि करायचे काहीच नाही, अशा पद्धतीने काम करते.

………………

नामांतराच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत बिघाडी होईल का नाही? हा त्यांचा प्रश्न आहे. पण मला असे वाटते की, त्यांची भूमिका ही वेळोवेळी बदलत असते. तसं पाहिलं तर काँग्रेस आणि शिवसेना या दोघांचे विचार पूर्व-पश्चिम आहेत. तरीसुद्धा त्यांनी युती केली. सत्तेसाठी, खुर्चीसाठी शिवसेना काही करू शकते, हे आपण या माध्यमातून पाहिले आहे. त्यामुळे त्यांना नामांतराच्या मुद्द्याचे फार घेणेदेणे नाही. ही फक्त महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांची घोषणाबाजी चालली आहे. ते शेवटच्या क्षणी तडजोड करतील, आम्ही फक्त ओरडू, निवडणूक करून घेऊ, नंतर बघू काय ते व तुम्ही म्हणाल तसे करु, असंही ते काँगेसला सांगत असतील,असा आरोपही महाजन यांनी शिवसेनेवर केला.

………………..

महाजन यांनी यावेळी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा आढावा घेतला. या ठिकाणी हमखास यश मिळणार आहे, यासह ज्या ठिकाणी काही प्रयत्न करणे आवश्यक असून त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना ताकद देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पूर्वी देखील भाजप एकटा होता आणि आजही भाजप एकट्याने समोरे जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामपंचायत निवडणूका या स्थानिक मुद्यावर लढल्या जात असल्या तरी त्याचा परिणाम जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर होत असल्याने पूर्ण ताकदीने ग्रामपंचायत निवडणूका लढण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

…………….

- Advertisment -

ताज्या बातम्या