Sunday, November 17, 2024
Homeनंदुरबारधक्कादायकः जिल्हयात दोन वर्षात तब्बल १५३९ बालमृत्यू आणि ३८ मातामृत्यू

धक्कादायकः जिल्हयात दोन वर्षात तब्बल १५३९ बालमृत्यू आणि ३८ मातामृत्यू

राकेश कलाल

नंदुरबार | दि.१७- NANDURBAR

- Advertisement -

नंदुरबार जिल्हयात सन २०२१-२२ आणि सन २०२२-२३ या दोन वर्षात तब्बल १ हजार ५३९ बालमृत्यू तसेच ३८ मातामृत्यू झाले आहेत. यात २०२१-२२ मध्ये ७७९, सन २०२२-२३ मध्ये ७६० बालकांचा मृत्यू झाला आहे. माता व बालमृत्यूची कारणे वेगवेगळी सांगण्यात येत असली तरी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळेच मृत्यूंची संख्या लक्षणीय झाली आहे. एवढया मोठया प्रमाणावर बालमृत्यू व मातामृृत्यू होत असतील तर महिला व बालकल्याण विभागातर्फे महिला व बालकांसाठी राबविण्यात येणार्‍या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत साशंकता व्यक्त होत आहे. या गंभीर प्रकाराकडे जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.

सन २०२१-२२

नंदुरबार जिल्हयात सन २०२१-२२ मध्ये ७७९ बालमृत्यू झाले आहेत. यातील ३४६ मृत्यू घरी, ४१३ मृत्यू आरोग्य केंद्रांमध्ये, ३ मृत्यू खाजगी रुग्णालयांमध्ये तर १७ मृत्यू संक्रमणामुळे झाले आहेत.

अक्कलकुवा तालुक्यात १२६ बालमृत्यू झाले आहेत. त्यात ६७ बालके तर ५९ बालिकांचा समावेश आहे. त्यातील ४३ बालके २८ दिवसाच्या आतील, ४५ बालके २९ दिवस ते १ वर्षादरम्यान, तर ३८ बालके १ ते ५ वर्ष वयोगटातील आहेत.

धडगाव तालुक्यात ११५ बालमृत्यू झाले आहेत. त्यात ६२ बालके तर ५३ बालिकांचा समावेश आहे. त्यातील ३७ बालके २८ दिवसाच्या आतील, ४५ बालके २९ दिवस ते १ वर्षादरम्यान, तर ३३ बालके १ ते ५ वर्ष वयोगटातील आहेत.

नंदुरबार तालुक्यात ४३ बालमृत्यू झाले आहेत. त्यात २१ बालके तर २२ बालिकांचा समावेश आहे. त्यातील २२ बालके २८ दिवसाच्या आतील, ११ बालके २९ दिवस ते १ वर्षादरम्यान, तर १० बालके १ ते ५ वर्ष वयोगटातील आहेत.

नवापूर तालुक्यात ४१ बालमृत्यू झाले आहेत. त्यात १६ बालके तर २५ बालिकांचा समावेश आहे. त्यातही १७ बालके २८ दिवसाच्या आतील, १२ बालके २९ दिवस ते १ वर्षादरम्यान, तर १२ बालके १ ते ५ वर्ष वयोगटातील आहेत.

शहादा तालुक्यात ३४ बालमृत्यू झाले आहेत. त्यात १७ बालके तर १७ बालिकांचा समावेश आहे. त्यातील ११ बालके २८ दिवसाच्या आतील, १३ बालके २९ दिवस ते १ वर्षादरम्यान, तर १० बालके १ ते ५ वर्ष वयोगटातील आहेत.

तळोदा तालुक्यात १२ बालमृत्यू झाले आहेत. त्यात ७ बालके तर ५ बालिकांचा समावेश आहे. त्यातही ३ बालके २८ दिवसाच्या आतील, ६ बालके २९ दिवस ते १ वर्षादरम्यान, तर ३ बालके १ ते ५ वर्ष वयोगटातील आहेत.

जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत ३७१ बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यात १९० बालके तर १८१ बालिकांचा समावेश आहे. त्यातही १३३ बालके २८ दिवसाच्या आतील, १३२ बालके २९ दिवस ते १ वर्षादरम्यान, तर १०६ बालके १ ते ५ वर्ष वयोगटातील आहेत.

ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालयांतर्गत ४०८ बालकांचा मृत्यू झाले आहेत. त्यात २२२ बालके तर १८६ बालिकांचा समावेश आहे. त्यातील ३५७ बालके २८ दिवसाच्या आतील, २८ बालके २९ दिवस ते १ वर्षादरम्यान, तर २३ बालके १ ते ५ वर्ष वयोगटातील आहेत.

अशाप्रकारे सन २०२१-२२ मध्ये ७७९ बालकांचा मृत्यू झाला असून त्यात ४१२ बालक तर ३६७ बालिकांचा समावेश आहे. त्यातही ४९० बालके २८ दिवसाच्या आतील, १६० बालके २९ दिवस ते १ वर्षादरम्यान, तर १२९ बालके १ ते ५ वर्ष वयोगटातील आहेत. यापैकी ३४६ बालकांचा घरी, ४१३ बालकांचा सरकारी रुग्णालये, ३ बालकांचा खाजगी रुग्णालयात तर १७ बालकांचा संक्रमणात मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या बालमृत्यूची कारणे वेगवेगळी सांगीतली गेली आहेत. यातील ६९ बालकांचा न्युमोनियामुळे, १२२ बालकांचा मुदतपूर्व प्रसुत झाल्याने तसेच कमी वजनामुळे, ४ बालकांचा अतिसारामुळे, ९१ बालकांचा जंतुसंसर्गामुळे, ६४ बालकांचा जन्मतः श्‍वासाच्या त्रासाने,

२३ बालकांचा जन्मजात व्यंगामुळे, १४३ बालकांचा श्‍वसनाच्या त्रासामुळे, १६ बालकांचा इजा व अपघातामुळे, ९ बालकांचा पाण्यात बुडून, ७ बालकांचा सर्पदंश किंवा विषबाधेने, ९ बालकांचा अकस्मात, १५ बालकांचा मेंदूज्वराने, २०७ बालकांचा इतर आजारांनी मृत्यू झाल्याची नोंद शासन दप्तरी करण्यात आली आहे.

या बालमृत्यूंची कारणे वेगवेगळी जात असली तरी यात भुकबळींची संख्या अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ७७९ पैकी २०७ बालके कोणत्या आजाराने मृत्युमुखी पडले आहेत, त्यांची स्पष्ट नोंद करण्यात आलेली नाही.

दरम्यान, एवढया मोठया प्रमाणावर होणार्‍या बालमृत्यू व मातामृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. बालमृत्यू व मातामृत्यू रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग तसेच महिला व बालकल्याण विभागातर्फे मोठया प्रमाणावर योजना राबविल्या जातात.

यासाठी कोटयावधी रुपयांचा निधी दरमहा दिला जातो. तरीही बालमृत्यू व मातामृत्यू रोखण्यात संबंधीत यंत्रणा सपशेल अपयशी ठरत असेल तर कोटयावधी रुपयांच्या योजना कशाप्रकारे राबविल्या जातात आणि कोणासाठी राबविल्या जातात याची प्रचिती येते.

त्यामुळे नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्हयात आदिवासी बालकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार्‍या आरोग्य यंत्रणा व महिला बाल विकास विभागाची चौकशी करण्याची गरज आहे. यासाठी जिल्हा परिषद प्रशासन, जिल्हा प्रशासनासह जिल्हयातील लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या