अंबासन | वार्ताहर Ambasan
डुकरांचे रक्षण करण्याच्या नावाखाली गावातील कुत्रे व मांजरांना विष देऊन ठार केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला. २० पेक्षा अधिक कुत्रे व चार मांजरांचा विषारी पदार्थ खाल्ल्याने मृत्यू झाला. या घटनेने संतप्त ग्रामस्थ व पशुप्रेमींचा जमाव चौकात जमुन दोषींवर कारवाईची मागणी करत आंदोलन केले. या घटनेची माहिती मिळताच जायखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वराह पालन करणार्या दोघा संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, यासंदर्भात ग्रामपंचायत प्रशासनातर्फे जायखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली गेल्याने पशुवैद्यकीय अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देत मृत कुत्र्यांचे शवविच्छेदन केले तर पोलिसांनी पंचनामा केला. याप्रकरणी दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिल्याने गावातील तणाव निवळला.
गत अनेक वर्षांपासून ग्रामस्थ व शेतकर्यांकडून ग्रामसभेत डुकरांच्या उपद्रवाची तक्रार केली जात आहे. डाळिंब, कांदा व मक्याच्या पिकांची मोठी हानी करतात. मात्र ग्रामपंचायतीने लेखी सूचना देऊनदेखील संबंधित डुक्कर मालकांनी याकडे दुर्लक्ष केले होते. आज सकाळी गावात ठिकठिकाणी कुत्रे व मांजरांचे मृतदेह आढळून आले. अंगणवाडी केंद्रालगत व चौकातदेखील मोठ्या प्रमाणात कुत्रे अकस्मात मृत दिसून आल्याने ग्रामस्थांनी चौकशी केली असता वराहांचे रक्षण करण्यासाठी त्यांचे पालन करणार्यांनी विषारी औषध पदार्थात टाकून कुत्रे व मांजरांना ठार मारल्याचे निदर्शनास आले. एका डुक्कर मालकाने यासंदर्भात कबुली दिल्याने ग्रामस्थ संतप्त झाले.
बुधाजी अहिरे यांच्या शेतातील कुत्रीने पिल्लांना जन्म दिला होता. मात्र विषबाधा झाल्याने कुत्रीसह तिची पिल्ले मृत्युमुखी पडली तर प्रशांत भामरे यांच्या शेडमधील व्यालेली कुत्री मृत्युमुखी पडल्याने पाच पिल्लांना दूध पाजण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी कुत्रे व मांजरींना ठार मारणार्यांवर कारवाईची मागणी केली. मोठा जमाव जमल्याने चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गावात धाव घेत डुकरांचे पालन करणार्या सुरेश शिंदे व अंबादास शिंदे या दोघा संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.




