Saturday, November 2, 2024
Homeभविष्यवेधकृष्ण जन्माष्टमी

कृष्ण जन्माष्टमी

दरवर्षी श्रावण कृष्ण अष्टमीच्या दिवशी श्री कृष्ण जन्माष्टमी हा सण भगवान श्री कृष्णाचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो.हा सण जगभर संपूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने साजरा केला जातो. श्रीकृष्ण युगा- युगापासून आपल्या श्रद्धेचे केंद्र आहेत. कधी ते यशोदा मैयाचे लाल असतात, तर कधी ब्रजचा खोडकर कान्हा. जन्माष्टमी केवळ भारतातच नव्हे तर परदेशात स्थायिक झालेले भारतीय देखील पूर्ण श्रद्धेने आणि उत्साहाने साजरी करतात.असे मानले जाते की जन्माष्टमी व्रताची पूजा केल्याने व्यक्ती मोक्षाला प्राप्त होतो आणि व्यक्ती वैकुंठ धाम मिळवतो.

भगवान श्री कृष्णाच्या जयंतीचा दिवस मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. श्रीकृष्ण देवकी आणि वासुदेव यांचे 8 वे पुत्ररत्न. मथुरेचा राजा कंस जो अत्यंत अत्याचारी होता. त्याचे अत्याचार दिवसेंदिवस वाढत होते.एकदा आकाशातून आकाशवाणी झाली की त्याची बहीण देवकीचा 8 वा मुलगा त्याचा वध करेल. हे ऐकून कंसाने आपली बहीण देवकी हिला पती वासुदेवसह अंधार कोठडीत ठेवले. कंसाने कृष्णाच्या आधी देवकीच्या 7 मुलांना मारले. जेव्हा देवकीने श्री कृष्णाला जन्म दिला, तेव्हा भगवान विष्णूने वासुदेवाला आदेश दिले की ते श्रीकृष्णाला गोकुळात यशोदा माता आणि नंद बाबांकडे घेऊन जावं, तिथे ते आपल्या मामा कंसपासून सुरक्षित राहतील. यशोदा माता आणि नंद बाबांच्या देखरेखीखाली श्रीकृष्णाचे संगोपन झाले. कृष्णाच्या जन्माच्या आनंदात दरवर्षी जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. जन्माष्टमी सण भगवान श्री कृष्णाचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो, हा सण रक्षाबंधन नंतर येणार्‍या अष्टमी तिथीला साजरा केला जातो.

- Advertisement -

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मंदिरांची विशेष आरास केली जाते. जन्माष्टमीला संपूर्ण दिवस उपवास करण्याचा नियम आहे. जन्माष्टमीच्या दिवशी प्रत्येक जण उपवास करतात. यादिवशी मंदिरामध्ये झांकी सजवतात आणि भगवान श्रीकृष्ण झोपाळ्यावर बसलेले असतात आणि रासलीला आयोजित केली जाते. घरांमध्ये बाळकृष्णाची मूर्ती पाळण्यात ठेवून आणि भजन करून हे पर्व साजरे करतात. यादिवशी सर्व प्रकारची हंगामी फळे, दूध, लोणी, दही, पंचामृत, धणे, सुकामेव्याची पंजरी, हलवा, अक्षत,चंदन,रोली,गंगाजल, तुळस,खडीसाखर,इत्यादी देवाला नैवेद्य अर्पण करून रात्री 12:00 वाजता पूजा करतात.

महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसर्‍या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दुधाने भरलेला हंडा ठेवून तेथपर्यंंत मानवी मनोर्‍यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो. हा महाराष्ट्रातील एक वैष्णव नृत्योत्सव आहे. श्रीकृष्णाने व्रज मंडळात गाई चारताना आपण व आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोर्‍या एकत्र करून त्या खाद्य पदार्थांचा काला केला व सर्वांसह त्याचे भक्षण केले अशी कथा आहे. या कथेला अनुसरून गोकुळाष्टमीच्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे.

गोपाल म्हणजे गायीचे पालन करणार्‍या कृष्णाच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो. काला म्हणजे एकत्र मिळविणे. पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी घालून केलेला एक खाद्यपदार्थ. हा कृष्णास फार प्रिय होता असे मानले जाते. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत असे मानले जाते.

गोपाळकाला श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रातिनिधीत्व करतो.

काल्यातील प्रमुख घटक – पोहे, दही, दूध, ताक व लोणी हे काल्यातील प्रमुख घटक त्या त्या स्तरावरील भक्तीचे निदर्शक आहेत.

पोहे : वस्तूनिष्ठ गोपभक्तीचे प्रतीक (काहीही झाले तरी श्रीकृष्णाला धरून ठेवणारे सवंगडी)

दही : वात्सल्यभावातून प्रसंगी शिक्षा करणार्‍या मातृभक्तीचे प्रतीक

दूध : गोपींच्या सहज सगुण मधुराभक्तीचे प्रतीक

ताक : गोपींच्या विरोधभक्तीचे प्रतीक

लोणी : सर्वांच्या श्रीकृष्णावरील अवीट प्रेमाच्या निर्गुणभक्तीचे प्रतीक

या दिवशी ब्रह्मांडात कृष्णतत्त्वाच्या आपतत्त्वात्मक प्रवाही गतिमान लहरींचे आगमन होते. काल्यातील पदार्थ या लहरी ग्रहण करण्यात अग्रेसर असतात.

इतर फायदे

शरीर व मन यांना पोषक : या दिवशी वायुमंडल आपतत्त्वाने भारीत असल्याने देहातील पंचप्राणांच्या वहनाला पोषक असल्याने मनाला उत्साह देणारे व देहाची कार्यक्षमता वाढवणारे असते.

सर्व सृष्टीच आनंदी असणे : वायुमंडलातील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने वृक्षचरही चैतन्ययुक्त लहरी ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अत्यंत संवेदनशील बनल्याने सर्व सृष्टीच आनंदी असते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या