श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda
श्रीगोंदा मतदारसंघात विधानसभेची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. नागवडे, पाचपुते, जगताप, दोन्ही शेलार, यासह अजून पाच ते सहा प्रमुख रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. यात अनुराधा नागवडे यांची तयारी जोरात असून आत्ता नागवडे महायुतीचे घटक असले तरी ‘विकास हवा तर आमदार नवा’ अशी टॅगलाईन घेऊन नागवडे तयारीला लागले आहेत. भाजपकडे हा मतदारसंघ राहिला तर नागवडे अपक्ष लढणार? शरद पवार यांच्या संपर्कात राहून ऐनवेळी गनिमी कावा करणार याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. आचारसंहिता कधी लागते आणि निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना श्रीगोंदा मतदारसंघात देखील प्रमुख इच्छुक असणार्यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक करायची असे म्हणत दोन्ही शेलार, दोन्ही पाचपुते, जगताप यांच्यासह अनेकजण कामाला लागले आहेत. सध्या महाविकास आघाडीत असणारे काँग्रेसचे घन:श्याम शेलार गावोगावी जात आहेत. माजी आमदार राहुल जगताप यांचीही तयारी जोरदार सुरू आहे. यासह तालुक्यातील अन्य इच्छुक सध्या मतदारसंघाच्या संपर्कात राहण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.
महायुतीमध्ये मात्र भाजप आणि मित्रपक्ष अजित पवार राष्ट्रवादी यात तिकिटासाठी रस्सीखेच दिसत आहे. हा मतदारसंघ भाजपचा असल्याने मतदारसंघ बदलून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मतदारसंघ सुटेल, अशी स्थिती नसल्याचे राजकीय जाणकार यांचे मत आहे. असे असले तरी नागवडे यांची तयारी जोरदार सुरू आहे. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून ते निवडणूक लढणार अशी घोषणा करत आहेत.