श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda
मतदारसंघात विरोधकांची झालेली गर्दी, दुसरीकडे तालुक्यातील बहुतेक बडे नेते विरोधात असताना ऐनवेळी आईची उमेदवारी विक्रम पाचपुते यांच्या वाट्याला आली. वडील तालुक्यासह राज्याच्या राजकारणात बडे नेते असले तरी आजारी असल्याने अडचण झाली. पण न डगमगता शांतपणे विरोधकांचे डाव पाहत, आपले प्रतिडाव शांतपणे टाकत विक्रम पाचपुते आमदार झाले आणि तालुक्याच्या राजकारणाची सगळी सुत्रे हाती घेत श्रीगोंद्याचा खरा ‘सिंह’ आपणच असल्याचे दाखवून दिले. यंदाच्या निवडणुकीत एक मोठी सभा वगळता पाचपुते यांनी गावोगावी छोट्या सभा, बैठक आणि भेटी यावर भर दिला. गावोगावी तरुण, नवे कार्यकर्ते सोबत घेत विजयीश्री खेचून आणली.
श्रीगोंदा मतदारसंघात मतमोजणीत पहिल्या फेरीपासून लीड घेणार्या पाचपुते यांनी विरोधकांना डोकेच वर काढू दिले नाही. नगर तालुक्यातील दोन्ही गटांसह तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटांत आघाडी घेत हा विजय मिळविला. मावळते आमदार बबनराव पाचपुते यांच्या तालमीत तयार झालेल्या विक्रमसिंह यांनी बंधू प्रतापसिंह, आई प्रतिभा पाचपुते यांच्या प्रयत्नाने मोठा विजय मिळवला. विधानसभा निवडणूक लागल्यानंतर महाविकास आघाडीत वाद सुरू झाले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील यांचा पराभव व खा. नीलेश लंके यांच्या विजयात श्रीगोंदेकरांनी महत्वाची भूमिका बजावलेली होती. लंके यांना श्रीगोंद्याने मोठे मताधिक्य दिल्याने यंदा आमदारही आमचाच होणार या अविर्भावात असणार्या आघाडीच्या प्रत्येक नेत्याला आमदार होण्याचे स्वप्न पडले होते.
राहूल जगताप व घन:श्याम शेलार यांच्या जोडीला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असणार्या अनुराधा नागवडे याही आल्या. आघाडीतून उमेदवारीसाठी सगळ्यांनीच प्रयत्न सुरू केले. त्यातच शिवसेनेने नागवडे यांना उमेदवारी दिल्यावर नाराज झालेल्या जगताप यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचे जाहीर करीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. सगळेच लढायला लागल्यावर अण्णासाहेब शेलार हेही मागे राहिले नाहीत. एकास एक लढत होत नाही हे लक्षात येताच पाचपुते यांनी त्यांचे आडाखे बांधले. भाजपाने जरी प्रतिभा पाचपुते यांची उमेदवारी जाहीर केली असली तरी पाचपुते कुटुंब कायमच देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगूलपणा ठेवून असल्याने त्याचा फायदा त्यांना ऐनवेळी उमेदवारी बदलण्यात झाला. दरम्यान, माजी आमदार राहूल जगताप, तालुक्याच्या राजकारणातील एक बडे प्रस्थ असणार्या अनुराधा नागवडे व माळी समाजाचे नेते अण्णासाहेब शेलार या तिघांना धूळ चारीत विक्रमसिंह पाचपुते यांनी 36 हजार 773 मतांनी दणदणीत आणि तेवढाच सफाईदार विजय मिळवित विक्रमच खरा सिंह असल्याचे दाखवून दिले.
यंदाच्या निवडणुकीत माळी समाजाची मते हा पाचपुते कुटुंबाचा आधार असल्याचे जाणकारांचे म्हणणे होते व यामुळे आण्णा शेलार यांची उमेदवारी पाचपुते यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार असल्याची चर्चा होती. त्यावर पाचपुते यांनी वाच्यता न करता सुप्तपणे थेट मतदारांमध्ये फिल्डींग लावत काम फत्ते करुन घेतले. सरकारच्या योजना विशेष करुन लाडकी बहिणीला लोकांमधून प्रतिसाद मिळतोय हे लक्षात घेतले.त्याचवेळी विरोधकांची मते विभागली जाणार असल्याने त्याचाही फायदा पाचपुते यांना मिळणार होता. पण हे विरोधकांच्या लक्षात आले नाही. पाचपुते यांनी त्यांचा प्रचार शांतपणे करीत टाकलेला प्रत्येक डाव त्यांना साथ देवून गेला आणि 36 हजार 773 मतांनी विरोधकांना चारीमुंड्या चीत करीत नवा आमदार म्हणून विक्रमसिंह यांनी सुत्रे हाती घेतली. विधानसभेच्या निकालाचे श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार असून आगामी काळात कोण कोणासोबत राहणार हे पाहवे लागणार आहे.