अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली. ही यादी जाहीर होताच अनेक मतदारसंघांत इच्छुकांमधून बंडखोरीस सुरूवात झाली आहे. भाजपने श्रीगोंदा मतदारसंघातून विद्यमान आ. बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या पदाधिकारी सुवर्णा पाचपुते यांनी बंडखोरीचे निशाण फडकवलं आहे. पक्ष बाहेरुन आलेल्यांनाच उमेदवारी देत असल्याचे म्हणत आपण अपक्ष लढू असे सुवर्णा पाचपुते यांनी सांगत आता पक्षाच्या नव्हे, तर जनतेच्या जिवावर विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
श्रीगोंदा मतदारसंघातून भाजपने पुन्हा पाचपुते कुटुंबीयांना तिकीट दिल्याने सुवर्णा पाचपुते प्रचंड नाराज आहेत. प्रतिभा पाचपुतेंच्या नावाची घोषणा होताच सुवर्णा पाचपुते यांना अश्रू अनावर झाले. मी इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. फक्त मला पक्षाला माझी ताकद दाखवून द्यायची आहे, असा इशारा सुवर्णा पाचपुते यांनी दिला आहे. यासोबतच सुवर्णा पाचपुते यांनी आपल्या कार्यालयातील भाजप नेत्यांचे फोटो आणि चिन्ह हटवले आहे. लोकांचा मला इतका आधार मिळाला आहे की आज माझ्या डोळ्यात पाणी येतयं पण ते खाली येत नाही. याचे कारण माझ्या मागे असलेला लोकांचा पाठिंबा हा आहे. लोक मला सांगत आहेत की कसंही करा आणि उभं राहा. पक्ष ही माझी विचारधारा होती.
लढले तर मी अपक्ष लढेल आणि इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. फक्त मला पक्षाला माझी ताकद दाखवून द्यायची आहे, असा इशारा सुवर्णा पाचपुते यांनी दिला आहे. मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून भाजपने उमेदवारी न देता बाहेरून पक्षात आलेल्या प्रस्थापितांनाच पक्ष उमेदवारी देत आहे. पक्ष धृतराष्ट्रासारखा झाला आहे. महाभारत होऊ द्या. जनतेचे काहीही होऊ द्या. फक्त आमची सत्ता आली पाहिजे हे पक्षाचे ध्येयधोरण आहे, असेही सुवर्णा पाचपुते म्हणाल्या. याबाबत सुवर्णा पाचपुते यांच्याकडे थेट विचारणा केली असता आता माघार नाही. पक्षाने उमेदवारी न दिल्याने आता जनतेच्या जीवावर विधानसभा निवडणूक लढणार असून त्यासाठी तयारी सुरू केली आहे. मतदारसंघातील जनता आपल्या सोबत असल्याचा दावा यावेळी सुवर्णा पाचपुते यांनी व्यक्त केला.
बबनराव पाचपुतेंच्या अडचणी वाढल्या
आधी आ. बबनराव पाचपुते यांच्यासमोर वेगवेगळ्या अडचणी असतांना पक्षाने पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर केली. विधानसभेसाठी पाचपुते यांच्या चिरंजीव विक्रम पाचपुते प्रयत्न करत असताना अचानक त्यांच्याऐवजी घरातील महिलेला उमेदवारी जाहीर झाल्याने पाचपुते यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. दम्यान, सोमवारी सकाळीच उमेदवारी बदलण्यासाठी पाचपुते कुटुंब मुंंबईला भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते. यावेळी काय चर्चा झाली याचा तपशील मात्र मिळाला नाही.