श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
श्रीगोंद्यात बिंगो जुगाराचा विळखा; तरुणाई कर्जबाजारी! शहरात अनेक ठिकाणी अवैध प्रकार सुरू असल्याचा आरोप; नव्या पोलीस निरीक्षकांकडून कारवाईची अपेक्षा श्रीगोंदा : शहरात दारू, मटका आणि जुगारामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाल्याच्या घटना ताज्या असतानाच आता बिंगो जुगाराचा नवा प्रकार सुरू झाला आहे. कमी वेळेत मोठी रक्कम मिळविण्याच्या आमिषाने अनेक तरुण या जुगाराच्या आहारी जात असून, काही जण कर्जबाजारी झाल्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. शहरातील विविध भागांत सुरू असलेल्या या अवैध जुगार अड्ड्यांवर नवे पोलीस निरीक्षक कारवाई करणार का, असा प्रश्न पालक आणि नागरिक उपस्थित करीत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शहरात बिंगो जुगाराचा प्रभाव वाढत असल्याचे चित्र आहे. बाजारपेठेतील लहान-मोठ्या दुकानांच्या आडोशाने तसेच मोकळ्या जागांवर छुप्या पद्धतीने हा जुगार खेळविला जात असल्याचा आरोप आहे. काही लाख रुपये मिळतील, या भाबड्या आशेने तरुण या प्रकाराकडे आकर्षित होत आहेत. या जुगाराच्या नादात एका तरुणाने मित्राचा मोबाईल फोटो काढण्यासाठी मागून घेतला आणि तो विकून मिळालेले पैसे जुगारात गमावल्याची घटना समोर आली आहे. अशा प्रकारांमुळे तरुणांमध्ये जुगाराचे व्यसन वाढत असून कुटुंबांचे आर्थिक गणितही कोलमडत आहे.
यामुळे परिसरात चोरी, आर्थिक फसवणूक आणि वादावादीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली असून, पोलिसांनी तातडीने अवैध बिंगो अड्ड्यांवर छापे टाकून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस व महसूल प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हप्त्याच्या चर्चेला उधाण
शहरात अनेक दिवसांपासून बिंगो जुगार सुरू असून, काही वेळातच लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची चर्चा आहे. या अड्ड्यांवर कारवाई होत नसल्याने हप्त्यांची देवाणघेवाण होत असल्याचीही चर्चा नागरिकांमध्ये आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.




