Monday, November 18, 2024
Homeनगरकाम आता अन् बिल नंतर अदा होणार असल्याने अनेकांचा नकार

काम आता अन् बिल नंतर अदा होणार असल्याने अनेकांचा नकार

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा तालुक्यातील विकास कामाचा गाजावाजा सुरू असताना सरकार कुणाचे असो अथवा लोकप्रतिनिधी कुणी असो, ठेकेदार मात्र तेच आहेत. या ठेकेदारांना निवडणुकीच्या तोंडावर नवीन काम करण्याची ऑफर देण्यात आली. मात्र, यातील अनेकांनी सावध पवित्रा घेत या सरकारच्या काळात काम मिळाले, पण त्याचे बिल मात्र पुढच्या टर्ममध्ये मिळणार असल्याने आता केलेली टक्केवारीची गुंतवणूक ही पुढच्या वेळी बदल झाला तर वसूल होईल का नाही, याबाबत शाश्वती नसल्याने काम करण्यास नकार दिल्याने तालुक्यातील भावी नेत्यांची अडचण झाली आहे.

- Advertisement -

श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघात रस्त्याची कामे मोठा प्रमाणात मंजूर होऊन सुरू आहेत. यासह पाणी योजना, सभागृह, स्थानिक विकास कामे ही धडाक्यात मंजूर होऊन सुरू करण्यात आली आहे. या कामाच्या गुणवत्तेचा विषय वेगळा असून याबाबत तक्रार करून कारवाई होत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. महायुती सरकारने विकास कामाचा धडाका लावला आहे. सरकार पुन्हा सत्तेत येण्यासाठी जनतेला खुष करण्यासाठी कामे करत आहेत. त्यांचा भाग म्हणून विकास कामांसाठी निधी देत आहे. ही कामे करण्यासाठी मर्जीतील ठेकेदार हवा असून त्यांची टक्केवारी सध्या चर्चेत आहे.

यामुळे पक्षाच्या विचारांशी बांधील नसणार्‍यांच्या नावे टाकण्यात येत आहे. यामुळे वडील एक नेत्यांचे समर्थक असताना मुलगा टक्केवारीचे काम मिळवण्यासाठी सत्ताधारी पक्षासोबत असल्याचे दिसत आहे. यामुळे तालुक्यात नेत्याच्या आणि त्यांच्या पुत्राच्या विरोधात मोठ्या प्रमाणात नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान शेवटच्या टप्प्यात काही ठेकेदार काम देतो भेटायला या, असे सांगितले. आता काम नको, बिलाचे काय? पुढील काळात तुमचे सरकार येईल? तुमचे नेते आमदार होतील की नाही, याची गॅरंटी नसल्याने अनेकांनी कामे नाकारल्याची माहिती सुत्रांनी दिली.

राजूचाचा मातीत घालणार
जिल्ह्यातील मुख्यालयमध्ये बसून कोण, किती कामाचा, कोण किती उपयोगाचे, कुणाचे आकडे किती, यावर कसे काय करावे, यासाठी मोजपट्टी घेऊन बसलेल्या राजूचाचाची तालुक्यात मोठी चर्चा सुरू आहे. या राजूचाचाच्या भरोशावर तालुक्यातील नेता मातीत जाण्याच्या मार्गावर असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

पीएच्या करामतीची चर्चा
चहापेक्षा किटली गरम, असा नेत्यांच्या पीए बाबतीत म्हटलं जाते. श्रीगोंदा तालुक्यातील गंधवाला पीएची चर्चा अधिक आहे. तो अनेक विकास कामात भागीदार असून टक्केवारी आणि ठेकेदाराच्या मिटिंगपर्यंत सगळे काम हा पीए घडून आणत आहे. विकास कामातील भागीदारीमुळे स्वत:च्या गावच्या मंदिराच्या विकास कामातच मोठा रोष पत्करावा लागला होता.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या