Friday, September 20, 2024
Homeनगरटक्केवारीच्या खेळाने कोट्यवधींच्या कामांचा बोजवारा

टक्केवारीच्या खेळाने कोट्यवधींच्या कामांचा बोजवारा

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

- Advertisement -

श्रीगोंदा मतदारसंघात काही कोटी रुपयांचा निधी महायुती सरकारने लोकप्रतिनिधींच्या भरवश्यावर दिला. यातून विकासकामे सुरू असल्याचे दिसत असताना प्रत्यक्षात मात्र गावच्या छोट्या कामापासून सुरू झालेल्या टक्केवारीच्या खेळाने कोट्यवधीच्या पाणी योजना, रस्त्याच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. दरम्यान, ठेकेदार, अधिकार्‍यांविषयी जनतेने तक्रारी केल्यास काम होईपर्यंत दम निघत नाही का? असा सल्ला देण्याचा प्रताप श्रीगोंदा तालुक्यात सुरू आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील विकास कामाच्या जाहिरातबाजीचा बोलबाला जोरात सुरू असला तरी प्रत्यक्षात मात्र कामाची गुणवत्ता राखायला ठेकेदार तयार नाहीत. या ठेकेदारावर ज्याचे नियंत्रण पाहिजे ते अधिकारी सुस्तावले असल्याने कोट्यवधीची विकासकामे सुरू आहेत; पण प्रत्यक्षात या कामाचे पुढे काय होणार? असा प्रश्न जनता विचारत आहेत. निकृष्ट कामाची आणि वेळकाढूपणा करणार्‍या अधिकारी यांच्यावर नियंत्रण ज्याचे पाहिजे त्यांनाच वैयक्तिक अडचणी असल्याने कुणावरच वचक आणि दबाव राहिला नाही. यात विरोधी पक्षाच्या एखाद्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जाब विचारलाच तर त्याला न जुमानणारी अधिकारशाही येथे अस्तित्वात आली आहे.

बहुतांश गावात पाणी योजनांचे काम किमान एक कोटी पासून पुढे पाच ते सात कोटी पर्यंत सुरू आहे. यात बहुतांशी पाणी योजना सुरूवातीपासून वादाच्या ठरलेल्या आहेत. कामाच्या गुणवत्तापासून योजना झालीच तर एखाद्या लाभार्थ्यांच्या दारात बसवलेल्या नळाला पाणी येईलच का याची शाश्वती ठेकेदारालाही देता येत नाही. दुसरीकडे दक्षिण- उत्तर रस्त्याचा कामाचा विकास करून आता पूर्व- पश्चिम रस्त्याचे मजबुतीकरणाची घोषणा करणार्‍यांनी प्रत्यक्षात मात्र रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष केले असून यात नागरिकांनी तक्रार करूनही कार्यवाही होत नाही. एखाद्या ठेकेदाराला सूचना केल्यातर तो ठेकेदार नेत्याकडे बोट दाखवत आहे.

यात श्रीगोंदा शहरातील कामापासून एखाद्या खेडेगावच्या कामात आणि सुरू असलेल्या बहुतांशी रस्त्याच्या कामात गुणवत्ता नसल्याने ठेकेदार नेमके कुणाचे घर भरत आहेत याचा सवाल जनता विचारत आहे. काही हजार कोटींची विकासकामे सुरू असल्याच्या वलग्ना होत असताना यातील सुरू असलेल्या विकासकामाची गुणवत्ता मात्र खराब असल्याने जोरात केलेल्या उद्घाटन आणि लावलेल्या फलकाची शाई सुकण्यापूर्वीच रस्ते खचले आणि उखडले आहेत.

भीमा पट्ट्यात बदलाचे संकेत
घोड, भीमा नदीच्या पट्ट्यात लोकप्रतिनिधींना मानणारा मोठा वर्ग आहे. याच पट्ट्याने त्यांना आजवर साथ दिली. मात्र तेथे एका रस्त्याचे काम सुरू असून गेल्या वर्षभरापासून ठेकेदाराने रस्ता खोदला पण पूर्ण केला नसल्याने आणि तक्रार केली तर जनतेला थांबायला वेळ नाही का म्हणत असल्याने याचा थेट फटका नेत्याबाबत नाराजीत झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या