श्रीगोंदा । प्रतिनिधी
श्रीगोंदा नगरपरिषदेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद यश संपादन केले आहे. नगराध्यक्षपदाच्या प्रतिष्ठेच्या लढतीत भाजपच्या सौ. सुनिता संतोष खेतमाळीस यांनी विजय मिळवत शहराचे प्रथम नागरिक होण्याचा मान पटकावला आहे. ही निवडणूक महायुतीमधीलच मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील अंतर्गत संघर्षामुळे राज्यभर चर्चेत होती. यामध्ये नगरसेवक पदाच्या एकूण २२ जागांपैकी १३ जागांवर भाजपने विजय मिळवला असून, शिवसेनेला ०९ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) पॅनल प्रमुख मनोहर पोटे यांना या निवडणुकीत मोठा सेटबॅक मिळाला असून, त्यांच्या पत्नी आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शुभांगी पोटे यांचा पराभव झाला आहे. इतकेच नव्हे तर मनोहर पोटे यांना दोन्ही प्रभागांतून पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे, भाजपच्या गोटात विजयाचा उत्साह असला तरी त्यांच्याही काही बड्या नेत्यांना फटका बसला आहे. माजी नगराध्यक्षा छायाताई गोरे, माजी उपनगराध्यक्ष अशोक खेंडके आणि अंबादास औटी या अनुभवी नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
प्रभागनिहाय निकालात पल्लवी पोटे, सुशीलकुमार शिंदे, अनिता औटी, अनिल औटी, अत्तर शेख, दिपाली बोरुडे, ऋषिकेश बोरुडे, भामाबाई कोथिंबीरे आणि श्रीकृष्ण धुमाळ या शिवसेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवला. तर राजेंद्र खेडकर, चांदणी खेतमाळीस, एम. डी. शिंदे, संग्राम घोडके, सोनाली गोरे, डॉ. अनिल घोडके, अश्विनी काळे, अलका अनभुले, कोमल बोरुडे, मनिषा आनंदकर, शहाजी खेतमाळीस, प्रशांत गोरे आणि मिरा शिंदे या भाजप उमेदवारांनी बाजी मारली आहे. या निकालामुळे श्रीगोंद्याच्या सत्तेच्या चाव्या आता पूर्णपणे भाजपकडे गेल्या असून, कार्यकर्त्यांनी शहरात मोठा विजयोत्सव साजरा केला आहे.




