Saturday, October 17, 2026
Homeनगरश्रीगोंदा तालुक्यात तब्बल २२ लाखांच्या वाहनांसह लाखो रुपयांचा गुटखा जप्त

श्रीगोंदा तालुक्यात तब्बल २२ लाखांच्या वाहनांसह लाखो रुपयांचा गुटखा जप्त

श्रीगोंदा । प्रतिनिधी

जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी आता कंबर कसली असून, श्रीगोंदा तालुक्यात गुटखा तस्करांचे नेटवर्क उद्ध्वस्त करणारी एक मोठी कारवाई समोर आली आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांच्या थेट मार्गदर्शनाखाली बेलवंडी पोलिसांनी धडक मोहीम राबवत तब्बल ४ लाख ४० हजार २९६ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला जप्त केला आहे. या कारवाईत गुटख्याची वाहतूक आणि साठवणुकीसाठी वापरली जाणारी २२ लाख रुपये किमतीची महागडी वाहनेही पोलिसांनी जप्त केली असून, संपूर्ण तालुक्यात या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी तत्काळ पावले उचलत बेलवंडी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार बेलवंडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर व त्यांच्या पथकाने लोणी व्यंकनाथ आणि आढळगाव शिवारात एकाच वेळी चक्र फिरवली. लोणी व्यंकनाथ येथील व्यावसायिक प्रवीण सतीश गायकवाड याच्या किराणा दुकान, गोडाऊन आणि क्रेटा गाडीची झडती घेतली असता, तेथे अवैध गुटखा मिळून आला. तसेच शरद सिताराम वडवकर हा देखील आपल्या दुकानातून गुटखा विक्री करताना रंगेहात पकडला गेला.

याच दरम्यान, दुकानदारांना गुटखा पोहोचवण्यासाठी आलेली मारुती सुझुकी कॅरी मालवाहतूक गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली. गाडीचा चालक नागेश नीलकंठ सुमकवर याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच, त्याने श्रीगोंद्यातील मुख्य सूत्रधार रवी बबन दळवी याच्या सांगण्यावरून हा माल आणल्याची कबुली दिली. तसेच आढळगाव येथील अक्षय राजू होले यालाही गुटखा पुरवल्याचे सांगितल्याने पोलिसांनी तेथेही धाड टाकून माल जप्त केला. या धडक कारवाईत पोलिसांनी गुटख्यासह एक क्रेटा गाडी, टोयोटा ग्लांजा आणि मारुती सुझुकी कॅरी गाडी असा एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी शरद वडवकर आणि नागेश सुमकवर यांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपासासाठी त्यांना श्रीगोंदा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नंदकुमार सोनवलकर, भाऊसाहेब यमगर, धर्मराज दहिफळे, शरद गांगर्डे, कैलास शीपनकर, राजू भोर आणि दादासाहेब शिरसागर यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे अवैध विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

ताज्या बातम्या

आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा पर्दाफाश; ‘मकोका’ अंतर्गत धडक कारवाई

0
पुणे | प्रतिनिधी शेअर बाजारात जादा परताव्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला असून या...