Tuesday, October 22, 2024
Homeनगरपाचपुतेंना उमेदवारी, नागवडेंकडून बंड

पाचपुतेंना उमेदवारी, नागवडेंकडून बंड

पदांचे राजीनामे || श्रीगोंदा मतदारसंघात दिले आव्हान

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

भाजपाकडून श्रीगोंदा विधानसभेसाठी प्रतिभा पाचपुते यांची उमेदवारी जाहीर होताच नागवडे परिवाराने महायुतीत बंडाचा झेंडा फडकवला आहे. वांगदरी येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अनुराधा नागवडे आणि राजेंद्र नागवडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. अनुराधा नागवडे यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढण्याची घोषणा करून बंडखोरी केल्याने पाचपुते यांना निवडणूक जड जाणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.
भाजपाकडून श्रीगोंदामधून विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांची उमेदवारी रविवारी जाहीर झाली.

- Advertisement -

यामुळे महायुतीमधून उमेदवारीसाठी इच्छुक राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे आणि त्यांचे पती जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या समर्थकांनी जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करत पुढील दिशा स्पष्ट केली. कोणत्याही परिस्थितीमध्ये अनुराधा नागवडे या निवडणूक लढवणारच असल्याची भूमिका त्यांनी घेतली. यासाठी महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढवण्याची तयारी नागवडे परिवाराने केली आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवारीबाबत बोलताना अनुराधा नागवडे म्हणाल्या, आम्ही महायुतीकडून उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न केले.

परंतु पक्षापुढे अडचण असल्याने आम्हाला उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचा राजीनामा दिला आहे. नागवडे परिवारातील आमदार व्हावा ही कार्यकर्त्यांसह तालुक्यातील जनतेची इच्छा आहे. त्यामुळे विधानसभेसाठी कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी करणार आहे. महाविकास आघाडीतील पक्षाकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले जातील. याबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय होईल,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राजेंद्र नागवडे यांनी आपली भूमिका जाहीर करत आपण उपमुख्यमंत्री अजित पवार याची भेट घेतली; पण त्यांनी योग्य निर्णय घेऊ एवढेच आश्वासन दिले. आपण सर्व पदांचा राजीनामा देत आहोत. आता पक्ष चिन्ह कोणतेही असो निवडणूक करणारच,असे सांगून याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महायुतीला धक्का
नागवडे परिवाराचे श्रीगोंदा तालुक्यात मोठे वर्चस्व असून त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यांनी अजित पवार यांची साथ सोडत त्यांना धक्का दिला आहे. मतदारसंघात विद्यमान आमदार विजयी होण्याची शक्यता नसल्यानेच भाजपकडून उमेदवार बदलण्यात आला, अशी चर्चा आहे. त्यातच 5 वर्षांत मतदारसंघात एकही ठोस काम झालेले नसल्याने मतदार नाराज असल्याचा दावा विरोधकांकडून केला जातो. यावेळी मतदारसंघात परिवर्तन होण्याची शक्यता वर्तविली जाते. यास्थितीत नागवडे यांनी बंडखोरी केली तर महायुतीसाठी तो धक्का ठरणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या