Friday, May 31, 2024
Homeनगरनववधुंनी केला नवरदेवांचा पोपट, लग्नानंतर नवर्‍या गायब

नववधुंनी केला नवरदेवांचा पोपट, लग्नानंतर नवर्‍या गायब

श्रीगोंदा शहरात आठ दिवसांत तीन घटना

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी)- लग्नासाठी मुलींची टंचाई लक्षात घेऊन मराठवाड्याच्या काही भागातून वधू शोधून आणल्या जात आहेत. मात्र या मुली नवरदेवाच्या हातावर तुरी देऊन लग्नानंतर गाशा गुंडाळून धूम ठोकत असल्याचे निदर्शनास आले आहे. श्रीगोंदा शहरात आठ दिवसांत अशा तीन घटना घडल्या आहेत. यात दोन घटनांमध्ये तर लग्न केल्यानंतर असलेल्या धामधुमीतच नववधू नवरदेवाला सोडून गेल्याचे समोर आले आहे. त्या गेल्याच पण जाताना दोन चार लाख रुपयांना गंडा घातला गेल्याने नवरदेवांकडील लोकांचा पोपट झाला आहे.

- Advertisement -

लग्नाचे वय जर मुलांसाठी 21 आणि मुलींसाठी 18 असले तरी मुलांच्या वाढलेल्या अपेक्षा त्यात महिला आणि पुरुष यांच्या जन्मदरातील तफावत जास्त असल्याने मुलींचे घटते प्रमाण यामुळे मुलीच्या आई वडिलांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. लग्नाचे स्वप्न वेळेत पूर्ण होत नसलेल्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा तरुणांचे पालक मुलाचे लग्न जमविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. यासाठी नातेवाईक, मित्रमंडळ, पाहुणे मंडळी यांची मदत घेत असतात.

त्यांच्या मध्यस्थीने वधुचा शोध सुरू असतो. एवढे करूनही मुलीचा शोध पूर्ण झाला नाही, तर जात सोडूनही लग्न लावले जातात. अशा विविधअंगी प्रयत्नानंतरही मुलांचे लग्न जमत नसल्यास अनेक वेळा मराठवाड्यात मुली शोधल्या जातात. यासाठी देखील दलाल असतात. त्यांच्या बिदागी बरोबरच या मुलींसाठी काही लाखांत पैसे मोजावे लागत आहेत. असे सोपस्कार पार पाडून लग्न उरकली जात आहेत.

मात्र अनेक वेळा अशाप्रकारे पैसे देऊन लग्न केल्याचे समाधान काहीकाळच टिकते. त्यात मोठी फसवणूक होत असल्याचे समोर येत आहे. काही लाख रुपये देऊन लग्नासाठी आणलेल्या वधू पळून जात आहेत. श्रीगोंदा शहरात आठ दिवसांत अशा तीन घटना घडल्या आहेत. यात एक मुलगी लग्नासाठी आल्यावर तिने थेट पोलिसांना पाचारण करून आपली सुटका केली. मात्र यात लग्न घरच्यांना दीड ते दोन लाख रुपयांचा चुना लावला. यात फसवणूक करण्यासाठी परजिल्ह्यातील एक टोळी सक्रिय असल्याचा संशय आहे.

श्रीगोंदे शहरात एका देवीच्या मंदिरात दोन लग्न सोहळे नुकतेच पार पडले. मोठ्या धामधुमीत गाव जेवण देऊन लग्न पार पडले. संध्याकाळी वरात देखील थाटात काढली. मात्र नवरी दुसर्‍या दिवशी हळद फेडायला जायचे, असे सांगून नवरदेवला घेऊन औरंगाबादला गेली. तिथे तिने आपल्या पतीला गोड बोलून येथे खिसेकापू असल्याचे सांगत पतीकडील पैसे ताब्यात घेतले. त्यानंतर एक पाणी बाटली आणते, असे म्हणून ही नवरी पसार झाली.

एका मैत्रिणीने या नवरदेवला तुमची सौभाग्यवती पसार झाल्याचे फोनवर सांगितले. तिसर्‍या घटनेत मुलीची आई लग्नानंतर मुलीला घेऊन गेली ती परत आलीच नाही. अशा घटना वाढत असताना याबाबत पोलिसांत तक्रारही देता येत नसल्याने नेमके करायचे काय, अशा चिंतेत वराकडील मंडळी आहेत.

लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी
राज्याच्या अनेक भागात अशाप्रकारे लग्नासाठी मुली पुरवणारी व लग्न झाल्यावर मुली गायब होण्याचे प्रकार घडले आहेत. यासाठी टोळ्या सक्रिय असून या अगोदर दीड-दोन लाख घेऊन मुली दाखवतात. पुन्हा लग्न लावल्यावर नवरी गायब होते. जाताना लग्नात आलेले दागिने, पैसे घेऊन जात असल्याने लग्नघरी अक्षरशः दिवाळे निघत आहे. अशा फसवणूक करणार्‍या टोळ्यांपासून सावधान राहण्याची गरज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या