श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
श्रीगोंदा नगरपालिकेत उपनगराध्यक्ष यांच्या कार्यालयात बसलेल्या एका शिंदेगट शिवसेनेचा पदाधिकारी आणि भाजपचे नगरसेवक यांच्यात सोशल वॉर वरून झालेल्या शाब्दीक चकमकीचे रूपांतर अचानक दोघांच्या हाणामारीत झाले पालिका कार्यलयाच्यासमोर हा प्रकार झाल्याने बघ्याची मोठी गर्दी झाली होती. मात्र दोन्ही बाजूच्या काही नगरसेवकांनी प्रकरण मिटवले पण नंतर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले.
शहरातील बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) चा जिल्हा पदाधिकारी यांचे आणि भाजपचे एक नगरसेवक यांच्यात मागील काही दिवसापांसून सोशल वॉर सुरू आहे. हा शिवसेना पदाधिकारी काही नगरसेवक आणि आमदार यांचे नाव घेऊन सोशल मीडियावर कायम आक्षेपार्ह टिप्पणी करत असल्याने याबाबत भाजप नगरसेवकाने आक्षेप घेतला होता. त्यातच काही दिवसांपूर्वी या दोघात एक सार्वजनिक कार्यक्रमातही टीका टिप्पणी करताना किरकोळ बोलचालीही झाली होती.
त्यानंतर मात्र हा पदाधिकारी कायम सोशल मीडियावर आपले नेते आणि सहकारी नगरसेवक यांच्या बाबतीत चुकीची टिप्पणी करत असल्याचे आरोप भाजप नगरसेवकाने केला होता. त्यातच गुरुवारी सकाळी हा शिवसेना पदाधिकारी पालिकेत उपनगराध्यक्ष यांच्या दालनात बसला असताना भाजप नगरसेवक जवळून जात असताना या दोघांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर हे दोघेही पालिकेच्या बाहेर रस्त्यावर आले तिथं सुरुवातीला शाब्दिक चकमक सुरू झाली त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.
तिथे भाजपचे एक नगरसेवक आणि माजी नगरसेवक यांनी भाजपचे नगरसेवक यांना समजावले तसेच शिवसेनेच्या पदाधिकारी यालाही एक नगरसेवक समजून सांगत होता मात्र तिथं मिटलेले प्रकरण पोलीस स्टेशनला गेले.दुपारी भाजपचे नगरसेवक यांनी या पदाधिकार्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र या शिवसेनेचे पदाधिकारी यांनी उशीरापर्यंत तक्रार दिली नव्हती.
राज्यात मित्र पक्ष श्रीगोंद्यात मात्र राडा
शिवसेनेचे पदाधिकारी याने आपल्या सोशल मीडियावर काही मुद्दे घेऊन वारंवार टीका टिपणी करण्याची राळ उठवली होती. यावरून भाजपचे नगरसेवक मुलाने याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला यातून प्रकरण वाढत गेले. याचे रूपांतर हाणामारीत झाले. प्रामुख्याने हे दोन्ही सत्तेत मित्र पक्ष असताना श्रीगोंद्यात मात्र राडा करत असल्याची चर्चा सोलश मीडियात रंगली आहे.