श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
राजकीय दृष्टीने समृद्ध असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील अवैध व्यवसायही तेवढाच समृद्ध असल्याने यात अवैध वाळूतस्करीचा मुद्दा कायम पुढे येत आहे, केवळ महसूल अधिकार्यांच्या कामचलाऊ धोरणामुळे आणि राजकीय पाठबळामुळे अवैध वाळू तस्करी जोरात असल्याने कधी कधी कारवाई करायला गेलेल्या महसूल पथकालाही वाळूतस्कराच्या रोषाला सामोरे जावे लागत असून दोन दिवसांपूर्वी अशाच कारवाईला गेलेल्या महसूल पथकाला आपला जीव वाचवून कारवाई करताना मोठी कसरत करावी लागली.
तालुक्यातील वाळू उपसा आता शेवटच्या दिशेने जात असल्याने मागील काही वर्षात वाळू साठयाचे लिलाव घोड, भीमा, सीना पात्रात झाले नाहीत. यामुळे अनेक जुन्या वाळूच्या धंद्यातील मातब्बरांनी पर्यायी नवे धंदे शोधले. यामुळे नवीन वाळू तस्कराची टोळी भीमा, घोड आणि सीना नदीच्या पात्रात वाळू काढण्याच्या धंद्यात उतरली आहे. वेळप्रसंगी गावातील काही गावपुढारी बरोबर घेऊन गावात विरोध करणार्यांना धाक दडपशाही करत अजनुज, पेडगाव, वांगदरी, राजापूर, माठ अशा भीमा, घोड आणि सीना पात्रात अवैध वाळू उपसा सुरू आहे.
महसूलमंत्री कितीही ठोस कारवाईचे आदेश देत असले तरी मागील दीड वर्षात एकही मोठी कारवाई महसूल प्रशासनाने केली नाही. एखादा हायवा, ट्रॅक्टर, मशीनवर कारवाई वगळता कणखर भूमिका तहसीलदार आणि महसूल यंत्रणेने केली नाही. सीना पात्रात वाळू तस्करावर कारवाईला गेलेल्या पथकावर थेट हल्ला करण्याचा प्रकार चवरसांगवी जवळ घडला. यात महसूल पथक आपला जीव वाचून आले. पण कारवाईला जाताना पोलीस पथक न्यायला कसे विसरले, असा प्रश्न आता जनता विचारत आहे.
अवैध वाळूतस्करांना बसेना जरब
मागील काही दिवसांपासून अवैध वाळूच्या तस्करीवर कारवाई होताना दिसत नाही. अजनुज, पेडगाव, सीना, घोड, भीमा पात्रालगतचे गावकरी वाळू तस्करी बंद करण्याची मागणी करतात. पण थेट तस्करांना कोण तक्रार करते याचे मॅसेज जात असल्याने गावकरी विनाकारण वाद नको म्हणून शांत आहेत. तहसीलदार यांचा धाकही तस्करांना राहिला नाही. एखाद्या ठिकाणी पथक गेले तर रोषाला सामोरे जावे लागत असताना केवळ खमक्या अधिकार्यांच्या गरज असल्याची मागणी आहे.
महसूल-पोलीस प्रशासनाची बसेना सांगड
अवैध वाळूतस्करी रोखण्याचे काम महसूल विभागाचे महसूल विभागालाही नदीपात्रात कारवाईला जाताना अनंत अडचणी येतात .जाताना निदान पोलीस पथक सोबत असावे, असा नियम असताना कारवाईला मात्र महसूल पथक एकटे जाते. जर ठोस कारवाई करायला जायचे असेल तर महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त पथक नेमून या तस्करांवर कारवाईची मागणी होत आहे.