Saturday, May 2, 2026
HomeनगरShrigonda : श्रीगोंद्याचा ऐतिहासिक वारसा ढासळला

Shrigonda : श्रीगोंद्याचा ऐतिहासिक वारसा ढासळला

शिंदे राजवाड्याची भिंत कोसळली || आत जाण्याचे सर्व मार्ग बंद

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

250 वर्षांपूर्वी दिल्लीचे तख्त राखण्याचे काम करत मराठ्याचा साम्राज्याचा जरीपटका उत्तर भारतात आणि अटकेपार लावणारे शिंदे घराण्याचा श्रीगोंद्यातील ऐतिहासिक राजवाड्याच्या वारसा संवर्धनाकडे रयत शिक्षण संस्था तसेच स्थानिक प्रशासन, पुरातत्व विभाग, राज्य सरकारने केलेल्या दुर्लक्षामुळे यंदाच्या पावसाळ्यात तो ढासळला आहे. इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या भिंती रविवारी मोठा आवाज करत कोसळल्या.

- Advertisement -

राजवाडा सुस्थितीत असेपर्यंत रयत शिक्षण संस्थने तिथे शाळा भरवली. नंतर संस्थेने इमारत बांधत शाळेचे स्थलांतर केले. पण राजवाड्याकडे मात्र दुर्लक्ष केले. आता हा वाडा भग्न अवस्थेत असून पडझड आणि पंधरा वर्षांपासून वाड्याची साफसफाई केली नसल्याने मराठ्यांचा इतिहास जागृत करणारा शिंदेवाडा अखेरच्या घटका मोजत आहे. राज्य सरकार, पुरातत्व विभाग आणि रयत शिक्षण संस्थेने पुढाकार घेऊन शिंदे घराण्याचा वारसा जतन आणि संवर्धित करण्याची गरज निर्माण झाली आहे.

श्रीगोंद्याला ऐतिहासिक वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या जहागिरीचा भाग राहिलेल्या श्रीगोंद्याची पाटीलकी शिंदे घराण्याचे राणोजी महाराज शिंदे यांच्याकडे आली. त्याचवेळी त्यांनी काही वास्तू, मंदिर इमारती शहरात बांधून घेतल्या सर्वात मोठा वाडा हा सात मजली होता. अनेकांनी हा सात मजली भव्य राजवाडा पाहिल्याचे आजही सांगितले जाते. काळाच्या ओघात व्यवस्थापनाने हा वाड्याचे मजले कमी केले. त्याचे कोरीव लाकडे, पुरातन साहित्याची विल्हेवाट लावण्यात आली. आता वाड्याचे केवळ दोन मजले राहिले आहेत.

वाड्यात भव्यता, काष्ट शिल्प, सात रांजण, महीरप,कमानी, भव्य प्रवेशद्वार आता जाण्यासाठी छोटे दरवाजे, खोल्या, जिने, वृंदावन, चौक अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेला वास्तुशास्र आणि इतिहासप्रेमींसाठी प्रेरणा देणारा मराठ्याचा पराक्रम आणि शौर्य याचा इतिहास पाहीलेला हा वाडा आता भग्न पावत आहे. पावसाचे पाणी मुरत आहे. वाड्यात मोठी झाडे उगवलेले आहेत. काही ठिकाणी जेसीबी लाऊन माती लाऊन दरवाजे बुजवले आहेत. इतिहास अभ्यासक यांना आत जाता येऊ नये अशी व्यवस्था करण्यात आली आहे. आत जाण्याचे सर्व मार्ग बंद केले आहेत.

ज्या वाड्यात राणोजी शिंदे यांनी पेशव्यांबरोबर वसईच्या लढाईपासून अनेक लढायांचे नियोजन केले. पानिपत सारखा रक्तरंजित इतिहासात ज्या शिंदे घराण्याच्या तीन पिढ्या एकाचवेळी पानिपतवर गेल्या. त्याचा साक्षीदार असलेल्या तसेच जेथे पेशवे, होळकर, पवारांबरोबर खलबते झाली उत्तर भारताचा कारभार ज्या राजवाड्यातून पाहिला गेला तो वाडा आता अखेरच्या घटका मोजत आहे.

राज्यातील ऐतिहासिक वारसा जपण्याचे काम पुरातत्व विभाग, राज्य सरकार करते मात्र श्रीगोंद्यातील वाड्याकडे दुर्लक्ष केले आहे. शनिवारवाडा, नाना फडणवीस यांचा वाडा, राघोबा पेशवे यांचा वाडा राज्य सरकारने संरक्षित करून त्याची दुरुस्ती केली. नुकतीच पानिपतची जमीन सरकारने घेतली. मात्र पानिपतवर तीन पिढ्या खर्ची घालणारे शिंदे घराण्याचा वारसा मात्र दुर्लक्षित केला आहे.

ऐतिहासिक शिंदे सरकारचा वाडा संपवण्याचा घाट आहे. वाड्याची वेळोवेळी दुरुस्ती केली असती तर तो आजपण चांगल्या स्थितीत राहिला असता. रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आणि येथील स्थानिक प्रशासन वाड्याच्या दुरवस्थेसाठी दोषी असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया दीपक शिंदे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Shirdi : पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी घेतले साई दर्शन

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi अहिल्यानगर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून मुम्मका सुदर्शन (SP Mummaka Sudarshan) यांनी शनिवारी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी शिर्डी...