Monday, June 24, 2024
Homeनगरश्रीगोंदा कत्तलखान्यात कारवाईला गेलेल्या पोलिसांवर हल्ला

श्रीगोंदा कत्तलखान्यात कारवाईला गेलेल्या पोलिसांवर हल्ला

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

- Advertisement -

शहरातील घोडेगाव रस्त्याच्या लगत सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर शनिवारी (दि.26) रात्री कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर गो तस्करानी हल्ला करत पथकाच्या अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी चौघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील कुख्यात आरोपी वर अगोदरच तडीपारीची कारवाई करण्यात आलेली होती.

अतीक गुलामहुसेन कुरेशी (रा.कुरेशी गल्ली, श्रीगोंदा), नदीम महम्मद कुरेशी (रा.श्रीगोंदा), ओंकार दशरथ सायकर (रा. राहु, ता.दौंड, जि. पुणे), समद कादरजी कुरेशी (रा. करमाळा, ता. करमाळा, जि.सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीगोंदा ते कर्जत रोड लगत कॅनॉलच्या कडेला अवैध कत्तलखाना सुरू असून याठिकाणी गायी कत्तलीसाठी आणल्याची माहिती श्रीगोंदा पोलिसांना मिळाली होती. याची खात्री करण्यासाठी शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान पोलीस हवालदार दादाराम शिवराम मस्के हे सहकार्‍यांसह सदर ठिकाणी गेले असता चारही संशयितांनी संगनमत करुन, त्यांचे कडील स्विप्ट कार गाडी पोलिसांच्या अंगावर घालून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करत धक्काबुक्की केली. शिवीगाळ दमदाटी केली. तसेच, शासकीय वाहनास धडक देऊन वाहनाचे नुकसान केले. दरम्यान पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 12 लहान गोवंश जातीची वासरे, 2 गायी, 1 गावरान गायी, 1 साहीवल जातीची गायी अशी एकूण 16 जनावरे सोडवली. त्यांनी जनावरांना निर्दयपणे वागणुक देवुन त्यांना कत्तलीकरीता डांबून ठेवले होते.

यातील आरोपी अतीक गुलाम हुसेन कुरेशी यास पोलीस अधिक्षक यांनी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार केलेले असताना तो विनापरवाना बेकायदेशीरपणे अहमदनगर जिल्ह्यात वावरत होता. तो पोलिसांना पाहून पळून गेला. दरम्यान अटक करण्यात आलेल्या संशयितांवर भा.द.वि. कलम 307, 353, 332, 427, 504, 506, 34 सह महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1976 चे (सुधारणा 2015)चे कलम 5 (अ) (ब) चे उल्लंघन 9, सह प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11 (घ), सह म.पो.का.कलम 142 प्रमाणे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग यांनी गुन्हा रजि.दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संपत कण्हेर प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या