Wednesday, September 2, 2026
HomeनगरShrirampur : श्रीरामपुरात आज सर्वपक्षीय मोर्चा; सलग तिसर्‍या दिवशीही शहर कडकडीत बंद

Shrirampur : श्रीरामपुरात आज सर्वपक्षीय मोर्चा; सलग तिसर्‍या दिवशीही शहर कडकडीत बंद

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

शहरातील तरुण हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या श्रीरामपूर बंदला मंगळवारी सलग तिसर्‍या दिवशीही व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहराच्या इतिहासात प्रथमच गुन्हेगारीविरोधात सलग तीन दिवस स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळण्यात आल्याने नागरिकांमध्ये वाढता असंतोष आणि सुरक्षिततेबाबतची चिंता स्पष्टपणे दिसून आली. दरम्यान आज सकाळी 10 वाजता शहरातील श्री हनुमान मंदिरापासून सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवारी सकाळपासून शहरातील प्रमुख बाजारपेठा, लहान-मोठी दुकाने, टपर्‍या तसेच विविध व्यावसायिक प्रतिष्ठाने पूर्णपणे बंद राहिली. या बंदमध्ये व्यापारी, उद्योजक, विविध सामाजिक संघटना, सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि सर्व धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. शनिवारी भरदिवसा लक्ष्मीनारायण पॅलेस हॉटेलमध्ये आकाश दुबैया यांची झालेली निर्घृण हत्या ही शहरातील वाढत्या गुन्हेगारीची गंभीर घटना मानली जात आहे. गेल्या पंधरा दिवसांत चाकू हल्ले, कोयत्याने वार, गोळीबार आणि इतर हिंसक प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे.

आंदोलनाची व्याप्ती वाढत असताना मंगळवारी शहरातील सरकारी, खासगी शाळा आणि महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली. नगरपालिका, रयत शिक्षण संस्था, हिंद सेवा मंडळ तसेच इतर शैक्षणिक संस्थांतील सुमारे 16 हजार विद्यार्थी घरीच राहिल्याने आंदोलनाला व्यापक सामाजिक पाठिंबा मिळाल्याचे चित्र दिसून आले. मात्र, सलग तीन दिवस शैक्षणिक संस्था बंद राहिल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी तीन दिवसांच्या शांततापूर्ण बंदमधून गुन्हेगारीविरोधातील रोष व्यक्त करत शहरात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आज बुधवारी सकाळी 10 वाजता श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यावर नागरिकांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार असून, दोषींवर कठोर कारवाई आणि शहरातील गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रणासाठी ठोस उपाययोजनांची मागणी करण्यात येणार आहे.

टाकळीभान, बेलापूर कडकडीत बंद; आज पेट्रोल पंपही बंद राहणार
श्रीरामपुरातील संघटीत गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी सलग तीन दिवसांपासून सुरु असलेल्या श्रीरामपूर बंदला पाठिंबा म्हणून तालुक्यातील टाकळीभान व बेलापूर येथील व्यावसायिकांनीही आपली दुकाने बंद ठेऊन उस्फुर्तपणे पाठींबा दिला. तर पेट्रोल पंप चालक संघटनेनेही या बंदला पाठिंबा म्हणून आज बुधवारी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत दोन तास पेट्रोलपंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : वाघाडीत ‘एमडी’चा साठा उद्ध्वस्त; तीन लाखांचे ...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati वाघाडी परिसरातील (Waghadi Area) वाल्मीक नगर येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी दुपारी छापा (Raid) टाकून सुमारे तीन लाख रुपये...