Friday, July 24, 2026
Homeनगरश्रीरामपुरात भाजप-अजितदादा गट एकत्र, शिंदे सेना स्वतंत्र लढणार

श्रीरामपुरात भाजप-अजितदादा गट एकत्र, शिंदे सेना स्वतंत्र लढणार

संगमनेरात आमदार पत्नी विरोधात आमदार भावजयी सामना रंगणार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपुरात नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या निवडणुकीत आ. हेमंत ओगले आणि जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे उमेदवार देण्यात आले आहेत. त्यांच्या विरोधात माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत श्रीरामपुरात भाजप-राष्ट्रवादी युती करण्याचा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट तसेच उध्दव ठाकरेंची शिवसेना हेही स्वतंत्र लढणार आहेत.

- Advertisement -

श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या काल शेवटच्या दिवसापर्यंत नगराध्यक्षपदासाठी 14 जणांनी 19 उमेदवारी अर्ज दाखल केले. काल अखेरपर्यंत नाट्यपूर्ण घडामोडी घडत होत्या. काँग्रेसकडून करण ससाणे यांनी अर्ज दाखल केलेला आहे. त्यांच्या विरोधात भाजपाच्या वतीने श्रीनिवास बिहाणी, शिंदे सेेनेकडून प्रकाश चित्ते तर ठाकरे गटाकडून अशोक थोरे यांनी अर्ज दाखल केले आहेत.

दरम्यान, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक यांच्या प्रमुख उपस्थितीत काल बैठक झाली. त्यात डॉ. विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपा महायुतीकडून माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देण्याचा प्रस्ताव ठेवला. परंतू काँग्रेसमधून भाजपात आलेल्या ‘त्या’ 11 माजी नगरसेवकांनी आदिक यांच्या नावाला तीव्र विरोध दर्शविला. चर्चेअंती श्रीरामपुरात भाजप-अजितदादांच्या राष्ट्रवादीत युती करण्याचा निर्णय झाला. भाजपाला नगराध्यक्ष पद आणि नगरसेवक पदाच्या 22 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 12 जागा देण्याचा निर्णय झाला. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून श्रीनिवास बिहाणी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अखेर अनुराधा आदिक यांनी (प्रभाग क्र.3 ब मधून) नगरसेवक पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

संगमनेरात आमदार पत्नी विरोधात आमदार भावजयी सामना रंगणार

आमदारांची प्रतिष्ठा पणाला, दुर्गाताई तांबे यांच्याकडूनही उमेदवारी दाखल

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर नगरपालिकेतही दोन आमदारांच्या नातेवाईकांमध्ये लढत रंगणार आहे. एकीकडे विधान परिषदेचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्या भावजयी सुवर्णा खताळ यांनी महायुतीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आमदार सत्यजित तांबे आणि आमदार अमोल खताळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

याशिवाय माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या धर्मपत्नी दुर्गा तांबे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुर्गा या माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भगिणी आहेत. मात्र, मंगळवारी (दि.25) अर्ज माघारीनंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे गेली अनेक वर्षे संगमनेरमध्ये कॉगे्रेसचा बोलबाला असताना मात्र यंदा काँग्रेसचा अधिकृत उमेदवार नसणार आहे.

शिर्डीत पाच महिलांचे अपक्ष अर्ज दाखल, चुरस अधिक रंगतदार
शिर्डी नगरपालिका निवडणुकीत महायुती एकसंघ राहिल्याचे चित्र स्पष्ट झाले असून महाविकास आघाडीत मात्र उघडी बिघाडी दिसून येत आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजपाच्या जयश्री थोरात, काँग्रेसच्या माधुरी शेजवळ, उबाठा (ठाकरे) गटाकडून भाग्यश्री सावकारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय पाच महिलांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करून चुरस अधिक रंगतदार केली असून शिर्डीत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी दहा उमेदवारांनी 11 अर्ज तर नगरसेवक पदाकरिता 132 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.

राहुरीत रस्सीखेच
राहुरी नगराध्यक्ष पदासाठी सखाहरी शांताराम बर्डे, राहुल अशोक बर्डे, भाऊसाहेब छबुराव मोरे (जनसेवा मंडळ आघाडी), सुनील ठकाजी पवार (भाजपा,दोन अर्ज), गुलाब मोहन बर्डे, बापुसाहेब भाऊसाहेब माळी(वंचित बहुजन आघाडी), ईश्वर नारायण मासरे (शिवसेना शिंदे गट), मृणाल भाऊसाहेब मोरे यांनी उमेद्वारी अर्ज दाखल केले. नगराध्यक्ष पदासाठी एकूण 12 अर्ज दाखल झाले आहेत.

राहात्यात गाडेकर विरूध्द गाडेकर; पठारे, गिधाड, सदाफळांचेही अर्ज
राहाता नगराध्यक्ष पदासाठी महायुतीकडून डॉ. स्वाधिन गाडेकर, महाविकास आघाडीकडून धनंजय गाडेकर, ठाकरे गटाकडून राजेंद्र पठारे, राष्ट्रीय जनमंच पक्षाकडून बाळासाहेब गिधाड, आम आदमी पार्टीकडून रामनाथ सदाफळ, बहुजन समाजवादी पार्टीकडून अनिल पावटे तर अपक्ष म्हणून भानुदास गाडेकर व तुषार सदाफळ या 9 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

नेवाशात तब्बल 27 इच्छुकांची उमेदवारी
नेवासा नगरपंचायत निवडणुकीसाठी महायुतीकडून शिवसेनेचे डॉ. करणसिंह घुले यंना पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून नंदकुमार पाटील, आम आदमी पार्टीकडून संजय सुखदान, तर काँग्रेसकडून अल्ताफ पठाण यांच्यासह नगराध्यक्षपदासाठी तब्बल 27 इच्छुकांचे अर्ज दाखल आहेत. अर्ज माघारीच्या मुदतीअंतीच खरे चित्र स्पष्ट होणार असले तरी निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

देवळालीत भाजपा, काँग्रेस, सेनेसह वंचित-बसपाचाही उमेदवार
देवळाली नगराध्यक्ष पदासाठी भाजपा कडून सत्यजित कदम, काँग्रेस कडून डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाडे. (दोन अर्ज), बसपाकडून आश्विनी चंद्रकांत दोंदे, शिवसेना (शिंदे गट) कडून बाबासाहेब मुसमाडे तर वंचित बहुजन आघाडीकडून अ‍ॅड. प्रसाद सांगळे, संतोष एकनाथ चोळके (वंचित बहूजन आघाडी),जयेश साहेबराव माळी (अपक्ष) अनंत कृष्णराव कदम (शिंदे गट), शिवाजी बाबुराव मुसमाडे (अपक्ष), गणेश बाळासाहेब भांड (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक बहुरंगी होणार चित्र निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्या

Crime News : एलसीबीचे जुगार, बिंगो व अवैध दारू अड्ड्यांवर छापे

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) कारवाई करत एमआयडीसी व श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जुगार, बिंगो आणि अवैध दारू व्यवसायावर एकाच...