श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी परवानगी न घेता बॅनर,पोस्टर्सवर आपले छायाचित्र छापून त्याचा वापर करून प्रचार करत आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. विनापरवानगी वापरण्यात आलेले माझे नाव व फोटोचे सर्व बॅनर्स काढून टाकण्यात यावेत, अशा सूचना कांबळे यांना द्याव्यात, अशा तक्रारीचे लेखी पत्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिले आहे.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीकडून अधिकृत उमेदवार म्हणून आ. लहू कानडे यांनी अर्ज भरला तर भाऊसाहेब मल्हारी कांबळे यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आ. लहू कानडे यांच्या प्रचार शुभारंभ सभेप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आ. कानडे हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचे स्पष्टपणे सांगितले. कांबळे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाहीर सभेसाठी आले नाहीत. मात्र त्यानंतरही कांबळे महायुतीचे उमेदवार असल्याचे सांगून प्रचार करत आहेत.
पालकमंत्री विखे यांनी आपल्या लेखी तक्रार अर्जानुसार, मतदारसंघातील उमेदवार भाऊसाहेब मल्हारी कांबळे हे माझे नाव व फोटो त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणार्या पोस्टर्स बॅनरवर टाकून मतदार संघामध्ये प्रचार करत आहेत. श्री. कांबळे यांनी त्यासाठी माझी कोणतीही तोंडी अथवा लेखी स्वरूपात परवानगी घेतलेली नाही. तसेच त्यांच्या उमेदवारीसाठी माझी कोणत्याही प्रकारची संमती अथवा समर्थन नाही. त्यांचे हे कृत्य बेकायदेशीर स्वरूपाचे आहे. विनापरवानगी प्रचारासाठी माझे नाव व फोटो वापरून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करून त्याचा फायदा निवडणुकीत करून घेण्याचा उद्देश त्यांचा दिसत आहे.
त्यामुळे अशा स्वरूपाच्या कृत्यास कायद्याने प्रतिबंध होणे गरजेचे असल्याने, त्यांच्याविषयी आपली तक्रार असून श्री. कांबळे यांनी माझे नाव व फोटो त्यांचे निवडणूक प्रचारक तसेच पोस्टर व बॅनर्सच्या माध्यमातून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल, असे कृत्य करू नये, असे आदेश त्यांना करावेत, असे आपल्या लेखी तक्रार अर्जात म्हटले आहे. दरम्यान लहू कानडे हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याने महायुतीचे मित्रपक्ष भाजप व शिवसेना यांनी लहू कानडे यांच्या प्रचारासाठी सक्रीय होऊन महायुतीचे उमेदवार म्हणून लहू कानडेंना विजयी करण्यासाठी जोमाने काम करणेबाबतही ना. विखे यांनी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले.