Tuesday, October 29, 2024
Homeनगरश्रीरामपुरात राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदे सेनेत मैत्रीपूर्ण लढत!

श्रीरामपुरात राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदे सेनेत मैत्रीपूर्ण लढत!

राष्ट्रवादी आ. लहू कानडे तर शिवसेनेकडून भाऊसाहेब कांबळे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर विधानसभा मतदार संघामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. काँग्रेस पक्षाने हेमंत ओगले यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर दोन दिवस विरोधी पक्षांची उमेदवार निश्चित होत नसताना काल सोमवारी सकाळी आ.लहू कानडे यांनी काँग्रेसचा हात सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश करून घड्याळाची उमेदवारी पदरात पाडून घेतली. तर काल सायंकाळी माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेची (शिंदे गट) उमेदवारी मिळवून श्रीरामपूरच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. त्यामुळे या मतदारसंघात शिंदे सेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढतीचे चित्र उभे राहिले आहे.

- Advertisement -

विद्यमान आ. लहू कानडे यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारुन काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हेमंत ओगले यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या आ. कानडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाची उमेदवारी पदरात पाडून घेतली. ही जागा शिवसेनेची असताना त्यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी मिळविल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत होते. लोकसभा निवडणुकीच्यावेळी विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीचा शब्द घेऊन उबाठा शिवसेनेतून शिंदे सेनेत दाखल झालेले माजी आ. भाऊसाहेब कांबळे उमेदवारीचे प्रबळ दावेदार असताना लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या सदाशिव लोखंडे यांनी आपले चिरंजीव प्रशांत लोखंडे यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला होता.

मात्र महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेवून कुणाला उमेदवारी दिली पाहिजे याबाबत मते जाणून घेतली असता अनेकांनी माजी आ.भाऊसाहेब कांबळे यांचे नाव सूचविल्यानंतर दुसर्‍या दिवशी (रविवारी) श्री. कांबळे मुंबईत दाखल झाले. या जागेवर वरिष्ठ नेत्यांमध्ये मोठ्या प्रमणावर खल झाल्यानंतर सकाळी आ. कानडे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्याची बातमी मतदारसंघात येवून धडकली. त्यामुळे कानडे समर्थकांनी ठिकठिकाणी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

सायंकाळी मात्र शिंदे सेनेची उमेदवारी भाऊसाहेब कांबळे यांना मिळाल्याची वार्ता धडकल्याने महायुतीची उमेदवारी नेमकी कुणाला याबाबत चर्चा सुरु असताना रात्री शिंदे सेनेच्या उमेदवारीच्या अधिकृत यादीत भाऊसाहेब कांबळे यांचे नाव झळकल्याने कांबळे समर्थकांनी जल्लोष केला. पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची वेळ घेऊन आज (मंगळवारी) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे श्री. कांबळे यांनी सार्वमतशी बोलताना सांगितले. तर लहु कानडे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश करुन एबी फॉर्म मिळविला.

ते आज मंगळवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे महायुतीच्या आ. कानडे व माजी आ. कांबळे यांच्यात मैत्रीपूर्ण लढत या मतदारसंघात रंगणार आहे. त्यात गेली दहा वर्षे शिर्डी लोकसभा मतदारसंघाची खासदारकी भूषविलेल्या सदाशिव लोखंडे यांचे सुपूत्र प्रशांत लोखंडे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. श्रीरामपुरातील आजची एकुण राजकीय परिस्थिती पाहता कोणता नेता कुणाच्या पाठिशी याचा अंदाज बांधणे सध्या तरी अवघड होवून बसले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या