Wednesday, October 23, 2024
Homeनगरश्रीरामपूर विधानसभा : बालेकिल्ला राखण्याचे काँग्रेसपुढे आव्हान

श्रीरामपूर विधानसभा : बालेकिल्ला राखण्याचे काँग्रेसपुढे आव्हान

श्रीरामपूर | Shrirampur

विधानसभेची निवडणूक अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपली आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात महायुतीकडून तसेच महाआघाडीकडून इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. अनेकांनी आपल्यालाच उमेदवारी मिळणार असा दावा केला आहे. अनु. जातीसाठी 2009 मध्ये हा मतदार संघ आरक्षित झाल्याने व आरक्षणाची ही 2024 अखेरची निवडणूक असल्याने अनेक इच्छुक आमदारांनी कंबर कसली आहे. किरकोळ अपवाद वगळता हा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला असला तरी या 2024 च्या निवडणुकीसाठी काँग्रेसचेच दोन गट एकमेकांवर डरकाळ्या फोडत असल्याने हा ‘गड’ शाबूत राखण्याचे काँग्रेसपुढे मोठे आव्हान उभे आहे.

- Advertisement -

सन 2009 साली हा विधानसभा मतदार संघ अनु. जातीसाठी आरक्षित झाला असला तरी 1995 ते 2019 या कालावधीत या मतदार संघावर काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व राहिलेले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकूण 11 इच्छुक उमेदवारांनी आपले नशिब आजमावले होते. मात्र खरी अटीतटीची लढत काँग्रेस व शिवसेनेतच झाली होती. तर अन्य उमेदवार चार अंकी मतापर्यंतही पोहचू शकले नव्हते. 2009 पासून काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांनी सलग 10 वर्षे या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदार संघातून त्यांनी उमेदवारी केली होती. मात्र शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला.

सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कांबळे यांना स्थानिक काँग्रेस संघटनेत विरोध वाढल्याने त्यांनी शिवसेनेतून उमेदवारी केली. ऐनवेळी भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी पदरात पाडून घेतली होती. त्यामुळे खरी लढत काँग्रेसचे लहु कानडे व शिवसेनेचे भाऊसाहेब कांबळे यांच्यातच झाली होती. त्यात लहु कानडे यांना 93 हजार 455 मते मिळाली तर भाऊसाहेब कांबळे यांना 74 हजार 525 मते मिळाली. लहु कानडे 19 हजार 994 मतांनी विजयी झाले होते.

आगामी 2024 ची विधानसभा निवडणूक आरक्षणाची शेवटची टर्म असल्याचे बोलले जाते. त्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. काँग्रेसचे विद्यमान आ. लहु कानडे पुन्हा उमेदवारीसाठी दावेदार आहेत तर काँग्रेसचेच गेल्या तीन पंचवार्षिकपासून उमेदवारीच्या प्रतिक्षेत असलेले प्रदेश सरचिटणीस हेमंत ओगले यांनीही उमेदवारीसाठी प्रबळ दावा ठोकला आहे. उमेदवारी निश्चित होण्यापुर्वीच मतदार संघ त्यांनी पिंजून काढला आहे. जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांची संघटना ओगले यांच्या पाठीशी ठाम उभी राहिल्याने काँग्रेस पक्षाच्या हक्काच्या मतांचे विभाजन होणार आहे. उमेदवारी मिळाली नाही तर सांगली पॅटर्न करण्याची घोषणा हेमंत ओगले यांनी यापुर्वीच केली आहे.

आ. कानडे यांचीही निवडणुकीची तयारी पूर्ण झाल्याने ऐनवेळी दोघांनीही उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला तर काँग्रेसच्या या मजबूत गडाला हादरे बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीच्या जागा वाटपाच्या फार्म्युल्यानुसार शिंदेच्या शिवसेनेला ही जागा जाणार असल्याचे समजते. त्यामुळे माजी आ. भाऊसाहेब कांबळे, माजी खा. सदाशिव लोखंडे यांचे पुत्र प्रशांत लोखंडे व नुकतेच शिंदे सेनेत दाखल झालेले उद्योजक जितेंद्र तोरणे तसेच उद्योग मंत्री उदय सावंत यांचे निकटवर्तीय असलेले माजी अधिकारी नितीन उदमले यांच्यात जोरदार रस्सीखेच होताना दिसत आहे. तर अटीतटीच्यावेळी हा मतदार संघ भाजपाच्या वाट्याला गेला तर गेली दोन वर्षे श्रीरामपुरात तळ ठोकुन असलेले नितीन दिनकर किंवा माजी प्रशासकीय अधिकारी नितीन उदमले यापैकी एक नाव उमेदवारीसाठी पुढे येऊ शकते. याशिवाय रिपाइंचे सुरेंद्र थोरातही उमेदवारीसाठी तयारीत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या