Friday, May 3, 2024
Homeनगरश्रीरामपूर-बेलापुरातील स्थानिक व्यापार्‍यांकडून कापूस उत्पादकांची लूट

श्रीरामपूर-बेलापुरातील स्थानिक व्यापार्‍यांकडून कापूस उत्पादकांची लूट

श्रीरामपूर |तालुका प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यात सततच्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील जवळपास सर्वच पिके पाण्याखाली गेली असून, उरली-सुरली पिके पदरात पाडून घेण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरू आहे.

- Advertisement -

दिवाळ सण जवळ आल्याने आणि खरीप वाया गेला पण निदान रब्बी हंगामातील पिके तरी चांगली येतील या भाबड्या आशेने पदरात पडलेला शेतमाल जिवापाड जपून शेतकरी स्थानिक व्यापार्‍यांकडे नेत आहे. मात्र डोळ्यावर कातडी ओढलेले हे व्यापारी मातीमोल भावात कापसाची खरेदी करत असून वजनमापातही मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याच्या तक्रारी आल्या असून या तक्रारींची दखल घेऊन मराठा महासंघ तहसीलदारांना रितसर निवेदन देऊन आंदोलनाचे हत्यार उपसणार असल्याचा इशारा मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष दिलीप थोरात यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात थोरात यांनी म्हटले आहे की, शेजारील तालुक्यात आणि राज्यात इतरत्र कापसाला पाच हजारांच्यापुढे 5300, 5400 असा भाव मिळत असताना श्रीरामपूर तालुक्यातील व बेलापूर परिसरातील स्थानिक व्यापारी आपापसात चेन करून स्वत:च भाव निश्चित करतात. शासनाचा हमीभाव 5800 रु.असताना हे व्यापारी पाच हजारांच्या आत म्हणजे अगदी 4500 ते 4800 पर्यंत माणूस बघून भाव काढतात.

त्यांच्या इलेक्ट्रॉनिक काट्यांचे प्रमाणीकरण केले आहे किंवा नाही? याचा कोणताही तपशील नाही.शेतकर्‍याने घरून मोजून नेलेल्या मालात बर्‍याच व्यापार्‍यांकडे क्विंटलमागे तब्बल दहा-दहा किलेची घट आल्याच्या तक्रारी स्वत: शेतकर्‍यांनी केल्या आहेत. वजन झाल्यानंतर क्विंटलमागे एक किलोची घट वेगळीच.हा सर्व प्रकार बाजार समितीला माहिती असताना ते ही आंधळ्याचे सोंग घेऊन शास्ती पदरात पाडून घेत मूग गिळून गप्प बसतात.

गतवर्षी बेलापुरातील एक वजन काटा सदोष असल्याचे निदर्शनास आल्याने शेतकरी वर्गात मोठी खळबळ उडाली होती.बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन त्वरित काटा दुरुस्त केला होता. मात्र आता या स्थानिक व्यापार्‍यांकडे असलेले वजनकाटे सदोष असल्याचे अनेक शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.भावात आणि मापात अशी दुहेरी लूट हे व्यापारी करीत आहे.

त्यात सर्वसामान्य शेतकरी भरडला जात असून शासनाचा हमीभाव फक्त जाहीर करायचा असतो का? असा प्रश्न उपस्थित होत असून जसे एफआरपीप्रमाणे उसाचे पेमेंट देणे कारखान्यांना सक्तीचे आहे त्याच धर्तीवर कापूस उत्पादक शेतकर्‍यांना शासनाने जाहीर केलेल्या हमीभावाप्रमाणे दाम मिळावे.शेजारील राहुरी तालुक्यात कापूस उत्पादक शेतकरी, शेतकरी संघटना, स्थानिक व्यापारी, माजी खा.प्रसाद तनपुरे यांच्यासमवेत तहसीलदारांच्या दालनात झालेल्या संयुक्त बैठकित हमीभावाप्रमाणे भाव देण्याचा निर्णय झाला आहे.श्रीरामपूर तालुक्यात मात्र शेतकर्‍यांना दिलासा मिळच्याच्यादृष्टीने असा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही.

कापूस पिकाचे अगोदरच अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने सरासरी एकरी उत्पन्नही कमीच आहे.वेचणीसाठी प्रतिकिलोला दहा रुपये असा मजुरीचा दर आहे. शिवाय मजुरांची ने-आण करण्यासाठी लागणारे गाडी भाडे वेगळेच. अशा अत्यंत अडचणीच्या काळात निदान झालेला खर्च वसूल करून पुढच्या पिकाची तयारी करता यावी आणि तोंडावर आलेल्या दिवाळ सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतील थोडीफार देणी देता यावी या आशेपायी शेतकरी कापूस विक्रीस आणत असून शेतकर्‍यांची मजबुरी ही संधी मानून हे व्यापारी सर्रास लूट करीत आहेत. आपणही शेतकर्‍याचेच पुत्र आहोत या गोष्टीचा त्यांना विसर पडला असावा.

मात्र इथून मागे जे झाले ते झाले पण आता या व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांची लूट न थांबविल्यास मराठा महासंघ कोणतीही पूर्वसूचना न देता शेतकरी आणि कार्यकर्त्यांसह कोणत्याही क्षणी आंदोलन करेल आणि त्याच्या होणार्‍या परिणामाची जबाबदारी सदर व्यापारी आणि बाजार समितीची राहील, असे मराठा महासंघाचे दिलीप मारुती थोरात यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या