श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
गेल्या अनेक महिन्यांपासून रखडत पडलेल्या भाजपाच्या तालुकाध्यक्षपदी बबनराव मुठे यांची
तर शहराध्यक्षपदी मारूती बिंगले यांची निवड करण्यात आली. भा.ज.पा.चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी या निवडी जाहीर केल्या.
जिल्हातील सर्व तालुकाध्यक्षांच्या निवड प्रक्रीया यापूर्वीच पार पडल्या होत्या; पंरतु श्रीरामपूरच्या निवड ही जिल्हा कोअर कमेटीपुढे गेली व जिल्हा कोअरकडे एकमत न झाल्याने तो निवडीचा चेंडू भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री प्रा.राम शिंदे, आ. राधाकृष्ण विखे, संघटनमंत्री किशोर काळकर, जिल्हाध्यक्ष राजेेंद्र गोंदकर यांच्यासमोर गेला. अखेर मुठे यांच्या नावावर एकमत होऊन श्री. गोंदकर यांनी पत्राद्वावरे निवड जाहीर केली.
श्री. मुठे यांनी या अगोदरही श्रीरामपूर भाजपाच्या तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली आहे. याचबरोबर गाव पातळीवरून सोसायटीचे चेअरमन, संत तुळशीराम महाराज देवस्थानचे विश्वस्त, अशोक साखर कारखान्याचे संचालक या अनेक पदांवर ते यशस्वीरित्या काम करत आहेत.
भाजपाने त्यांचे हे काम पाहून माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे व भाजपाचे मा. जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड यांनी मुठे यांना जिल्हा नियोजन समितीचे सदस्य केले होते. या पदाचाही तालुक्यातील अनेक देवस्थानला निधी मिळवून देऊन त्यांनी आपल्या कामचा ठसा उमटवला.
पक्षाने त्यांना भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे जिल्हा अध्यक्षपदाची ही जबाबदारी मागच्यावेळी दिली होती. या आघाडीत त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात काम करून त्यांना प्रदेशाने विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्र आध्यात्मिक आघाडीच्या प्रभारी पदाची जबाबदारी दिली होती. अशा अनेक पदांवर त्यांनी काम केले आहे.
या सर्व कामांची दखल घेऊन जिल्हाध्यक्ष गोंदकर यांनी मुठे यांची निवड केली. तर शहराध्यक्षपदी निवड झालेल्या मारूती बिंगले यांनीही यापूर्वी शहराध्यक्ष म्हणून चांगले काम केले आहे.आगामी काळात होणार्या नगरपरिषदेसह जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत व सहकारी संस्था स्वबळावर लढविणार आहे. यामध्ये भाजपाचे जुने व नवे कार्यकर्ते यांना बरोबर घेऊन निवडणुका लढविणार असल्याचे श्री. मुठे यांनी निवडीनंतर सांगितले.
गेल्या आठवड्यात बबन मुठे यांची आध्यात्मिक आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषारजी भोसले यांनी जिल्हाध्यक्ष गोंदकर यांची शिफारस घेऊन निवड केली होती.