Sunday, May 19, 2024
Homeनगरश्रीरामपूरला बसला हादरा अन् थरथरले दरवाजे, खिडक्या !

श्रीरामपूरला बसला हादरा अन् थरथरले दरवाजे, खिडक्या !

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

काल गुरुवारी सकाळी अचानक खिडक्या अन् दरवाजे थरथरले. एक तासात एकदा नव्हे तर चक्क पाच-सहा वेळा त्याची पुनरावृत्ती झाल्याने श्रीरामपूरकर हादरले. हा नेमका काय प्रकार होता याबाबत दिवसभर शहरातील नागरिकांमध्ये चर्चा सुरू होती. दरम्यान, हे हादरे विळद घाटात सुरू असलेल्या के.के. रेंज (लष्करी प्रशिक्षण केंद्र) मधील लष्करी सरावातील गोळीबारामुळे होत असल्याचा खुलासा महसूल प्रशासनाकडून नगरच्या आपत्ती व्यवस्थापनाचा हवाला देत नागरिकांनी भीती बाळगू नये, असे आवाहन केले आहे. राहुरी भागातही असाच प्रकार घडल्याचे वृत्त आहे.

- Advertisement -

काल गुरुवारी सकाळी 9 ते 10 या वेळेत श्रीरामपूर शहरातील गजल हॉटेल, रामचंद्रनगर, थत्ते मैदान परिसर, मुळा-प्रवरा परिसर, बेलापूर रोड, गायकवाड वस्ती, बेलापूर गाव यासह राहुरी तालुक्यात घरांच्या खिडक्या हलल्याचे तसेच हादरे बसल्याचा प्रकार घडला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली. या घटनेनंतर शहराच्या या भागातून त्या भागातील नागरिकांचे फोन सुरू होऊन या प्रकारावर चर्चा झाली. हा प्रकार नेमका कशामुळे याबाबतही दिवसभर शहरात चर्चा झडत होती. दरम्यान, याबाबत श्रीरामपूर महसूल विभागास याबाबत नागरिकांनी माहिती दिली. त्यानंतर संबंधित अधिकार्‍यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाशी संपर्क साधून माहिती घेतली असता विळद घाट येथे सुरू असलेल्या के.के. रेंज येथील लष्करी प्रशिक्षणाच्या गोळीबारामुळे हा प्रकार झाल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता हवामान विभाग व भूकंप मोजमाप केंद्र मेरी (नाशिक) येथील भूकंप यंत्रावर कुठलीही नोंद झाली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, सध्या पावसाळ्याचे दिवस आहे मात्र पाऊस गायब आहे. पाऊस सुरू असताना वीज चमकल्यानंतर काही वेळाने ज्या पध्दतीने आवाज ऐकू येतो. तसाच आवाज सकाळी 11 वाजेच्या सुमारास श्रीरामपूर तालुक्यात ठिकठिकाणी येत होता. त्यामुळे अनेकांना या आवाजाने आभाळाकडे पहायला लावले.

- Advertisment -

ताज्या बातम्या