Wednesday, February 4, 2026
HomeनगरShrirampur : श्रीरामपूर शहराची आरोग्य व्यवस्था कोलमडली

Shrirampur : श्रीरामपूर शहराची आरोग्य व्यवस्था कोलमडली

कचरा गाड्या बंद, सर्वत्र घाणीचे साम्राज्य || नागरिकांचे आरोग्य धोक्यात

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

एकीकडे पावसाळा सुरू असताना, दुसरीकडे शहरामध्ये आरोग्य व्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहे, शहराची आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. पालिकेच्या आरोग्य खात्याच्या दुर्लक्षामुळे ऐन पावसाळ्यात शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात पसरलेल्या घाणीमुळे रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. पालिकेने शहरातील कचरा संकलन करण्यासाठी ज्या कंपनीला ठेका दिला होता, त्याची मुदत संपल्याने संबंधित ठेकेदाराने आता आपल्या कामात कुचराई करण्यास सुरुवात केली आहे. कचरा भरण्यासाठी येणार्‍या घंटा गाड्या बर्‍याच भागामध्ये गायब झाल्या आहेत. दोन-दोन दिवसाआड कचरा गाड्या येत आहेत, कचर्‍याच्या गाड्यावर वाजणारे भोंगे आणि गाणी आता बंद झाली आहेत.

- Advertisement -

याबाबत कचरा उचलणार्‍या कर्मचार्‍यांना विचारले असता, गाड्या बंद झाल्या आहेत, बिघडले आहेत त्यामुळे आता ट्रॅक्टरमध्ये कचरा भरण्याचे काम सुरू आहे, असे सांगितले जाते, पूर्वी सदरच्या कचरा गाड्या सकाळी सकाळी गाणी वाजवत आल्यानंतर लोक आपला घरातील कचरा त्या गाड्यांमध्ये देत होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या गाड्या नादुरुस्त झाल्याचे कारण देऊन कचरा उचलणे टाळले जात आहे, काही भागांमध्ये कचरा गाड्या येत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. परंतू, या बाबीकडे नगरपालिका दुर्लक्ष करीत आहे.

YouTube video player

शहरात सोशल मीडियाच्या माध्यमातून काही जण नागरिकांचे प्रश्न मांडतात, सदर ग्रुपमध्ये नागरिकांनी तक्रार केल्यानंतरच दखल घेतली जाते. एरवी कधीही नियमितपणे शहरात कचरा सफाई होत नाही, प्रत्येक वेळी पालिकेच्या आरोग्य खात्याला जाणीव करून द्यावी लागते, त्यानंतरच संबंधित भागातील कचरा उचलला जातो. शहरातील सर्वच भागामध्ये रस्त्यांवर कचरा साचला आहे. नागरिकही रस्त्यावर कचरा टाकतात. त्यांच्यावर सुद्धा पालिकेने कारवाई केली पाहिजे, परंतू पालिका असे कोणतेही पाऊल उचलण्यास असमर्थ ठरल्याचे दिसत आहे. रस्त्यावर कचरा टाकल्याने हवेने तो इतरत्र विखुरला जातो. आणि नंतर जनावरे देखील ते पसरवण्याचे काम करतात. शहरामध्ये कचर्‍याबरोबरच मोकाट कुत्री आणि डुकरे यांच्या संख्येतही लक्षणिय वाढ झाली आहे. मोकाट कुत्र्यांचा प्रश्न सर्वच भागात निर्माण झाला आहे. यामुळे लहान मुले, महिला यांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुत्र्यांची नसबंदी किंवा त्यांना पकडण्यासंदर्भात पालिका काहीच कारवाई करीत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.

शहरात डुकरांचा सूळसूळाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे डुकरे रस्त्यावर लोळत असतात, तसेच मधूनच इकडे तिकडे पळतात. त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. आरोग्य खात्याचे कर्मचारी या सर्व गोष्टींकडे कानाडोळा करीत असल्याने शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिकेने स्वच्छतेचा ठेका नियमित करावा, आणि पुर्णक्षमतेने शहरातील कचरा उचलण्यासाठी पाऊल उचलावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पालिकेमध्ये आरोग्य खात्याचे अनेक अधिकारी, कर्मचारी आहेत. स्वच्छता निरीक्षक आहेत. मात्र, हे कधीही शहरांमध्ये फेरफटका मारत नाहीत, अशा तक्रारी सुद्धा नागरिकांनी केल्या आहेत. मुख्याधिकार्‍यांनी आरोग्य खाते सक्षम करावे, आरोग्य निरीक्षकांना शहराच्या प्रत्येक भागामध्ये पाहणी करण्यासाठी पाठवावे, त्यांच्याकडे दररोज अहवाल घ्यावा, अशी मागणी शहरातील जनतेतून होत आहे.

नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप हे एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित आहेत. नगरपालिकेत सध्या प्रशासक राजवट असल्याने सर्व विभागाचा कारभार त्यांच्या अधिपत्याखाली सुरु आहे. परंतू त्यांच्या हाताखाली काम करणारे अधिकारी त्यांना योग्य ते सहकार्य करीत नाही, सर्व खात्यांचा कारभार पाहताना त्यांची देखील आता दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे. पालिका निवडणुकीची तयारी सुरू असल्याने त्यांचा बराच वेळ त्या कामात जात आहे. आरोग्य खात्यामध्ये कर्मचार्‍यांमध्ये आपसात ताळमेळ नसल्याने शहरात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्याधिकारी यांचा प्रभाव या कर्मचार्‍यावर नसल्याने, हे कर्मचारी मनमानी करीत आहेत. त्यामुळे मुख्याधिकार्‍यांनी यासंदर्भात कडक पावले उचलावी, व शहरातील आरोग्य यंत्रणेला शिस्त लावावी, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : शिर्डीत भाविकांची लूट करणार्‍या एजंटांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईनगरीत दर्शनासाठी येणार्‍या लाखो भाविकांची (Devotee) अडवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या एजंटांच्या (Agent) मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. भाविकांची...