श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर नगरपलिकेचे माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, माजी नगरसेवक शशांक रासकर, आशिष धनवटे आदींसह काँग्रेसच्या सुमारे 100 हून अधिक जणांनी काल मुंबई येथे जावून भाजपात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे श्रीरामपुरात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण व जलसंपदा तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात हा प्रवेेश सोहळा पार पडला.
माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, माजी नगरसेवक भारती कांबळे, दत्तात्रय सानप, शामलिंग शिंदे, आशिष धनवटे, शशांक रासकर, मनोज लबडे, राजेंद्र आदिक, कैलास दुबय्या, सोमनाथ गांगड, संजय गांगड, विजय शेळके, दिगंबर फरगडे, सुनील क्षीरसागर, विराज भोसले, अॅड. युवराज फंड, व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष वैभव लोढा, सचिव दत्तात्रय ढालपे, उपाध्यक्ष निलेश बोरावके, पराग शहा, राकेश न्याती, संदीप अग्रवाल, चेतन भुतडा, योगेश डंबीर, चिरायू नगरकर, सिद्धार्थ फंड, अमोल शेटे, सुयोग गायकवाड, नारायण छल्लारे, अमोल बोंबले, राजेंद्र वाघमारे, राजेंद्र बोरसे, योगेश शहाणे, कल्पेश माने, विशाल फोेफळे, सागर भागवत, धिरज तलवार, बाबा गांगड यांच्यासह 100 हून अधिक जणांनी मुंबईतील भाजपच्या पक्ष कार्यालयात पक्ष प्रवेश केला.
यावेळी ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, काँग्रेसमधील पदाधिकार्यांसह व्यापारी, उद्योजकांनी श्रीरामपूरच्या विकासासाठी भाजपवर विश्वास ठेवला. यापुढील काळात श्रीरामपूर शहराचा विकास अजून जोमाने करू, असे आश्वासन ना. विखे पाटील यांनी दिले. पक्षात प्रवेश दिल्याबद्दल बिहाणी यांनी आभार मानून श्रीरामपूरच्या विकासासाठी काँग्रेसला सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगतिले. आगामी काळात जिल्ह्यात भाजपाची ताकद अधिक वाढविण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी जोरदार बॅटींग सुरु केली आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या श्रीरामपूर शहरातील काँग्रेसचा मोठा गट फोडण्यात विखे यांना यश आले आहे. या प्रवेशामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या श्रीरामपूरमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.
पालकमंत्री विखे यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे. त्यांनी श्रीरामपूरात अनेक विकास कामे केली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा या दोन्ही पुतळ्यांचे कामे त्यांनी मार्गी लावली. माजी आ. स्व.जयंतराव ससाणे यांचे श्रीरामपूरला मुबलक पाणी उपलब्ध करण्याचे स्वप्न होते. आता नव्या साठवण तलावासाठी ना. विखे पाटील यांनी 175 कोटी रूपये दिले असून त्याचे काम सुरू आहे. अतिक्रमण हटविण्यात आल्यानंतर ना. विखे यांची भेट घेतली असता त्यांनी पुनर्वसनाचा शब्द दिलेला आहे. गोरगरीबांसाठी चार हजार घरकुले बांधण्यात येणार आहेत. श्रीरामपूरच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वांनी हा निर्णय घेतला आहे.
– संजय फंड, माजी नगराध्यक्ष
या पक्ष प्रवेशाने फारसा फरक पडत नाही. हे गेल्यामुळे संधीअभावी थांबून असलेल्या नवीन चेहर्यांना संधी मिळेल. पक्षाची नव्याने बांधणी करू. आगामी पालिका निवडणूकही जिंकू. आपण सत्तेपुढे वाकणारे नाहीत. जे गेले ते मनाने गेलेले दिसत नाही. त्यांच्या काही अडचणी असतील, त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला असेल.
– आमदार हेमंत ओगले
काँग्रेसचा हा मोठा गट भाजपात गेला त्यांना एका युवा नेत्याने तिकडे पाठविले आहे. ज्या ठिकाणी काँग्रेसची हक्काची मते आहेत ती मिळविण्यासाठी त्या भागातील माजी नगसेवकांना मागे ठेवले व इतरांना पुढे पाठविले आहे. आगामी नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेेवून हा पक्षप्रवेश ठरवून केला आहे.
– माजी आ.भानुदास मुरकुटे