श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शहरातील नागरिकांना नागरी सुविधा देण्याची जबाबदारी नगरपालिकेची असताना त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. नागरिकांना सातत्याने पिण्यासाठी दूषित पाणीपुरवठा होत आहे, सार्वजनिक स्वच्छतागृहाची अवस्था तर भयानक आहे, चौका-चौकात भाजीपाला विक्रेत्यांची बेकायदेशीर दुकाने सुरू आहेत. नगरपालिका प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याने भविष्यकाळात नागरिकांना साथीच्या आजाराचा सामना करावा लागणार आहे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी नगरपालिकेच्या नागरी सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
ज्या प्रवरा कालव्यातून शहराला पाणीपुरवठा करणार्या साठवण तलावात पाणी घेतले जाते, या पाईपलाईनवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झालेली आहेत, काही लोकांनी पक्के घरे बांधलेली आहे, अशा घरातील सांडपाण्यासह स्वच्छतागृहाचे पाणी कालव्यात सोडण्यात आले आहे, गेल्या अनेक महिन्यापासून नागरिक याविषयी तक्रारी करतात. परंतू, नगरपालिका त्याची दखल घेत नाही. पाणीपुरवठा करणार्या साठवण तलावत मोठ्या प्रमाणावर घाण साचलेली आहे. यापूर्वी या तलावात मेलेली जनावरे सापडली होती. नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असतानाही नगरपालिका दररोज अशुद्ध व स्वच्छतागृहाचे पाणी नागरिकांना पाजत आहे.
मोरगे वस्तीसह शहरातील विविध भागातील सार्वजनिक स्वच्छतागृहाची अवस्था अत्यंत दयनिय झालेली आहे. अनेक स्वच्छतागृहांचे दरवाजे गायब आहेत, त्या ठिकाणी पाण्याची सोय नाही, स्वच्छतागृहाची नियमित साफसफाई होत नाही, स्वच्छतागृहात जाण्यासाठी रस्ता नाही, काही ठिकाणी स्वच्छतागृहाच्या छतावर मोठमोठे झाडे उगवलेले आहे, अनेक ठिकाणी कचर्याचे ढीग साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे, स्वच्छतेच्या कामावर नगरपालिका कोट्यावधी रुपये खर्च केल्याचे दाखवते, पण प्रत्यक्षात नागरिकांना स्वच्छतेबाबतची कुठलीही सुविधा मिळत नाही, मग या कामावर होणारा लाखो रुपयांचा मलिदा कोणाच्या घशात जातो? ठेकेदाराला कोण पाठीशी घालत आहे, हा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे.
शहरात मोठा गाजावाजा करून अतिक्रमणे काढण्यात आली, या अतिक्रमण मोहिमेची इतिहासात नोंद केली पाहिजे, एक महिन्यानंतर अतिक्रमण मोहिमेची गर्जना थंड झाली. आणि इतकी थंड झाली ज्या ठिकाणी अतिक्रमणे काढण्यात आली, त्या ठिकाणी पुन्हा नव्या जोमाने अतिक्रमणे झाली. मुख्याधिकार्यांनी पुन्हा अतिक्रमण झाले तर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता, या ठिकाणी पुन्हा वीज पुरवठा देण्याबाबत नगरपालिका एनओसी देणार नाही, असे ठणकावून सांगत होते, परंतु अशा अतिक्रमण धारकांना पुन्हा पालिकेनेच परवानगी दिली.
शहरातून जाणारा प्रवरा उजवा व डावा कालव्यावरील अतिक्रमणे तात्काळ काढा, प्रवरा कालवा अतिक्रमणमुक्त करा, असा आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाला दिला होता, जलसंपदा विभागाने कालवा परिसरात 8.66 एकर क्षेत्रावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी 2,077 अतिक्रमण धारकांना सात दिवसांची तिसरी नोटीस दिली, नोटीस मुदत संपली असतानाही जलसंपदा विभागाने अजून कारवाई केलेली नाही, दोन्ही कालव्याची कचराकुंडी झालेली आहे. याला जेवढी नगरपालिका जबाबदार आहे तेवढेच परिसरातील नागरिक ही जबाबदार आहे, जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी कालवा अतिक्रमण मुक्त करण्याच्या दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी कधी होणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.
करोना कालावधीपूर्वी शहरातील नेहरू भाजी मंडई गजबजलेली होती. नंतर ही मंडई बंद पडली. शहरातील चौका-चौकात व रस्त्यावर भाजी विकणारे लोक बसू लागले, त्यामुळे वाहतूकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे, या ठिकाणी लहान मोठे अपघात होत आहे, नेहरू भाजी मंडई बंद पडल्याने आता या ठिकाणी अवैध व्यवसाय सुरू आहे, विशेष म्हणजे भाजी मंडई ही शहर पोलीस स्टेशनच्या शेजारी आहे.




