Sunday, September 8, 2024
Homeनगरश्रीरामपूर जिल्ह्यासाठी ग्रामसभेचे ठराव करण्याचे आवाहन

श्रीरामपूर जिल्ह्यासाठी ग्रामसभेचे ठराव करण्याचे आवाहन

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

प्रभू श्री रामाच्या नावाने पावन झालेला श्रीरामपूर जिल्हा होण्याची मागणी 42 वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित आहे. मात्र निकषाचा आधार न घेता शासनाने श्रीरामपूर ऐवजी शिर्डीत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्याचा अध्यादेश काढला. याला प्रामुख्याने श्रीरामपूर, कोपरगाव, राहुरी, नेवासा तालुक्यातून तीव्र विरोध होत आहे. यावर सर्व स्तरावर जनआंदोलने सुरू आहे. सद्यस्थितीत श्रीरामपूर जिल्हा मागणीला लोकशाही मार्गाने न्याय मिळण्यासाठी न्यायालयातही कायदेशीर लढाई करावी लागेल. यासाठी जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीने जास्तीत जास्त ग्रामसभेचे ठराव करावेत, असे आवाहन पत्रकाद्वारे श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी केले.

- Advertisement -

राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटना, गाव, सोसायटी, औद्योगिकसंघटना, वकिल संघटना, वैद्यकीय संघटना, पत्रकार संघटना, शैक्षणिक संघटना, बांधकाम व्यावसायिक संघटना, पतसंस्था मल्टीस्टेट, सर्व व्यापारी संघटना-असोसिएशन, सर्व धर्मीय उत्सव मंडळ, कामगार संघटना, पेन्शनर्स संघटना, बचतगट, प्रवासी संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटना प्रतिनिधींनी ठराव किंवा पाठिंबा पत्र द्यावे. आणि सर्व नागरिकांनीही स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहनही राजेंद्र लांडगे यांनी केले.

राजेंद्र लांडगे म्हणाले, समितीने शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. अजित काळे यांची भेट घेऊन कायदेशीर सल्ला घेतला आहे. आ. लहू कानडे यांनी येत्या पावसाळी अधिवेशनात श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी पुन्हा तारांकित प्रश्न उपस्थित करावा. त्या आधारे शासनाची भूमिका समोर येईल. त्यानंतर कोर्टात कायदेशीर मार्गाने न्याय मिळवता येईल अशी ग्वाही दिली. यासाठी जास्तीत जास्त ग्रामसभेचे आणि विविध सामाजिक संघटनेचे ठराव आवश्यक राहतील असा सल्ला अ‍ॅड. अजित काळे यांनी दिला.

यावेळी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, युवराज जगताप, इंद्रभान चोरमल, सुदाम औताडे, प्रभाकर कांबळे, शरद आसने, शरद पवार यांनी श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीला जाहीर पाठिंबा व्यक्त केला.

ग्रामसभेची आणि विविध संघटनेची ठराव मोहीम यशस्वी होण्यासाठी उपाध्यक्ष सुभाष जंगले, अनंत निकम, करण नवले, चंद्रकांत परदेशी, देविदास चव्हाण, नागेश सावंत, अशोक बागुल, अभिजित बोर्डे, मनोज हासे, राजेंद्र गोरे, विजय नगरकर, सचिन बडधे, अशोक थोरे, किशोर फाजगे, रामपाल पांडे, रवि गरेला, अशोक लोंढे, तिलक डुंगरवाल, कुणाल करंडे, लकी सेठी, दिपक पुरी, नानासाहेब तुपे, दत्तात्रय महाराज बहिरट, किशोर झिंजाड, सुनील शेळके, अनिल सावंत, संदीप पवार आदी परिश्रम घेत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या