Wednesday, May 22, 2024
Homeनगरश्रीरामपूर ‘जिल्हा’ मुख्यालय होण्यासाठी श्रीरामपूरकर पुन्हा एकवटले

श्रीरामपूर ‘जिल्हा’ मुख्यालय होण्यासाठी श्रीरामपूरकर पुन्हा एकवटले

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहर व तालुक्यातील सर्वच नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा ‘श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय’ व्हावे, या मागणीसाठी पुन्हा एकदा श्रीरामपूरकर एकवटले… मंगळवारी विजयादशमीच्या दिवशी अनेकांनी श्रीरामपूर जिल्हा व्हावा, असे साकडे श्रीराम प्रभूंच्या चरणी घातले.

- Advertisement -

क्षेत्रफळाच्यादृष्टीने सर्वात मोठा असणार्‍या अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा व्हावा ही अनेक दिवसांपासूनची येथील नागरिकांची मागणी नव्हे तर.. हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. जिल्हा मुख्यालय होण्यासाठी सर्वच परिस्थिती श्रीरामपूरमध्ये अनुकूल असल्याने ही मागणी जोर धरत आहे.

जिल्हा मुख्यालयाच्या बाबत आमदार लहू कानडे म्हणाले, श्रीरामपूर जिल्हा व्हावा, हा माझ्याही जिव्हाळ्याचा विषय आहे. मी आमदार झाल्यानंतर हाऊसमध्ये देखील अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा मुख्यालयाचा विषय घेतला होता. श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय होण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन विविध आंदोलने करणे गरजेचे आहे. यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी मी तयार असल्याचे आ. लहू कानडे यांनी सांगितले.

माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक म्हणाल्या, माजी मंत्री खा. स्व. गोविंदराव आदिक यांनी श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय व्हावे यासाठी खुप प्रयत्न केले. जिल्हा होण्यासाठी आवश्यक सर्व गोष्टी त्यांनी श्रीरामपूर याठिकाणी आणल्या होत्या. श्रीरामपूर जिल्हा व्हावा, ही आमचीही प्रामाणिक इच्छा आहे. यासाठी लागेल ते सर्व सहकार्य करण्यासाठी आम्ही तयार आहोत.

माजी उपनगराध्यक्ष रवी गुलाटी म्हणाले, प्रभू श्रीरामाला व सीतामातेला सीता हरण होईल याची कल्पना नव्हती. परंतु श्रीरामपूर जिल्ह्याचे हरण होणार आहे. याची कुणकुण श्रीरामपूरकरांना आधीच लागलेली आहे. म्हणून सावध व्हा.. जोपर्यंत श्रीरामपूर जिल्हा होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसू नका, जिल्ह्याचे ठिकाण दुसरीकडे गेल्यास श्रीरामपूरचे वाटोळे निश्चित आहे. सर्वांनी एकत्रित येऊन श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी लढा उभारा, जोपर्यंत श्रीरामपूर जिल्हा होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसू नका त्यामध्ये सातत्य ठेवा, असे ते म्हणाले.

श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी प्रताप नाना भोसले यांनी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीची स्थापना करून जिल्हा मुख्यालय होण्यासाठी शहरात सह्यांची मोहीम राबविली, श्रीरामपूर बंदची हाक देऊन बंदही यशस्वी केला होता. अनेक मंत्र्यांना निवेदनेही दिली होती. परंतु नंतरच्या काळामध्ये जिल्हा कृती समितीचा लढा कमी पडला. त्यानंतर राजेंद्र लांडगे यांनी या लढ्यात सातत्य ठेवले. स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या माध्यमातून अध्यक्ष सुभाष त्रिभुवन, कार्याध्यक्ष बाबा शिंदे व उपाध्यक्ष संदीप मगर यांनी या लढ्यात उडी घेतली.

गेल्या काही दिवसांपासून हा लढा काहीसा थंडावल्याचे वाटत होते परंतु आता श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय व्हावे, या मागणीसाठी श्रीरामपूरकर पुन्हा एकदा एकवटल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता श्रीरामपुरातील पुढार्‍यांना तसेच नागरिकांनाही आता रस्त्यावर उतरावे लागणार आहे. विविध मार्गाने आंदोलने करून श्रीरामपूर जिल्ह्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा करावा लागणार आहे.

नगर जिल्ह्याचे विभाजन झाले तर श्रीरामपूर हाच नवीन जिल्हा होणार! नाहीतर जिल्हा विभाजन होणार नाही व इतर कोणत्याही ठिकाणी जिल्हा मुख्यालय होऊ देणार नाही, असा श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचा ठाम निर्धार असल्याचे समितीचे अध्यक्ष प्रताप भोसले यांनी सांगितले.

श्रीरामपूर जिल्ह्यासाठी उद्या लाक्षणिक उपोषण

श्रीरामपूर जिल्हा कृती समिती व शिवप्रहारच्यावतीने श्रीरामपूर जिल्हा व्हावा या मागणीसाठी शनिवार दि. 28 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 पासून पुढे दोन तास लाक्षणिक उपोषण गांधी पुतळा येथे करण्यात येणार आहे. लोकशाही मार्गाने होणार्‍या या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे व प्रशासनाचे श्रीरामपूर जिल्हा व्हावा या श्रीरामपूरकरांच्या मागणीबाबत लक्ष वेधण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या