Tuesday, September 29, 2026
HomeनगरShrirampur : श्रीरामपुरात डीजेच्या दणदणाटाला लगाम

Shrirampur : श्रीरामपुरात डीजेच्या दणदणाटाला लगाम

गणेशोत्सव-नवरात्रोत्सव शांततेत साजरा करण्याचे पोलिसांचे आवाहन

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

आगामी गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डीजे व ध्वनिवर्धकांच्या वापराबाबत असलेल्या निर्बंधांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा शासकीय व प्रशासकीय आदेशांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिला. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन व श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उत्सव मंगल कार्यालय येथे शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस सरपंच, पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक तसेच विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

मुमुक्का सुदर्शन म्हणाले की, सण-उत्सव हे सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि धार्मिक सलोखा वाढविणारे असतात. त्यामुळे उत्सव साजरे करताना कायदा व सुव्यवस्थेला कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची प्रत्येक मंडळाने आणि नागरिकांनी काळजी घ्यावी. उत्सवाच्या काळात पोलीस प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करून प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन, वाद किंवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक गणेश मंडळाने आवश्यक परवानगी घेऊनच उत्सवाचे आयोजन करावे, तसेच मंडळांनी स्वयंसेवकांची नियुक्ती करून गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेबाबत दक्षता घ्यावी, पारंपारीक वाद्यावर भर द्यावा, असे आवाहनही करण्यात आले. मंडळाच्या पदाधिकार्‍यांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला. शहरातील संवेदनशील ठिकाणे, मिरवणुकीचे मार्ग, ध्वनिप्रदूषण, वाहतूक कोंडी तसेच रात्रीच्या वेळी होणार्‍या गैरप्रकारांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. उत्सवाच्या काळात अफवा पसरविणार्‍यांवरही कारवाई केली जाणार असून नागरिकांनी सोशल मीडियावरील कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता त्याची खातरजमा करावी, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, तहसिलदार मिलींदकुमार वाघ, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल खैरे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, मुख्याधिकारी मनोज उकीर्डे, महावितरणचे अधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, गणेश मंडळांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सण-उत्सव आनंदाचा; मात्र कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी सर्वांचीच असल्याने प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून गणेशोत्सव व नवरात्रोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते कुणाल करांडे यांनी गणेशोत्सवातील मिरवणुका तसेच विविध उपक्रमांच्या आयोजनासाठी पोलीस प्रशासनाने मंडळांना आवश्यक सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. शिवसेनेचे राजेंद्र देवकर यांनीही उत्सव कालावधीत प्रशासनाने गणेश मंडळांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नागेश सावंत यांनी उत्कृष्ट सामाजिक व विधायक कार्य करणार्‍या गणेश मंडळाला 5 हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहिती दिली. श्रीमती रमादेवी धिवर यांनी शहरातील मोकाट गायी तसेच विनानंबर मोटारसायकलींवर कारवाई करण्याची मागणी केली. बैठकीच्या शेवटी पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. तसेच गणेश मंडळांनी केवळ उत्सव साजरा न करता सामाजिक बांधिलकी जपावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. गरजू व गोरगरीब विद्यार्थिनींना मंडळांच्या वतीने सायकलींचे वाटप करण्याचा उपक्रम राबवावा, असे आवाहन त्यांनी केले.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक वाढली; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 5000 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची (Onion) मंगळवारी राहाता...