अहिल्यानगर (प्रतिनिधी)
शिरसगाव (ता. श्रीरामपूर) येथील रहिवासी 26 वर्षीय विवाहितेने आपले पती व सासरच्या मंडळींविरूध्द मानसिक व शारीरिक छळ केल्याची फिर्याद गुरूवारी (22 मे) नगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पतीसह सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
पती नीलेश राजू दुशिंगे, नंदई प्रमोद सोनवणे, ननंद माया प्रमोद सोनवणे, सासरे राजू दुशिंगे (सर्व रा. शिरसगाव, ता. श्रीरामपूर) तसेच कल्पना सुरेश सोनवणे व सुरेश सोनवणे (पत्ता माहिती नाही) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 7 सप्टेंबर 2023 पासून सासरी त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होता.
पती नीलेश याच्यासह नंदई प्रमोद, ननंद माया, सासरे राजू, तसेच कल्पना व सुरेश सोनवणे या सर्वांनी मिळून त्यांना सतत त्रास दिला. पती नीलेश याने पतसंस्थेमध्ये नोकरी लागण्यासाठी फिर्यादीच्या माहेरून तीन लाख रूपये आणण्यासाठी दबाव टाकला होता. पैसे न दिल्यास उपाशी ठेवणे, मारहाण करणे आणि शिवीगाळ करण्याचा प्रकार सातत्याने होत होता. या छळाला कंटाळून पीडिताने अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पीडिता सध्या डोंगरगण (ता. अहिल्यानगर) येथे राहत असून त्यांनी 22 मे रोजी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार एम. यु. शेख करीत आहेत.